ऊस उत्पादक शेतकर्यांची प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयात पार पडली बैठक
गुरुवारचे भजन आंदोलन तात्पुरते स्थगित
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री गजानन महाराज साखर कारखान्याकडून आश्वासन देऊन देखील चार महिन्यापूर्वीचे थकित पेमेंट मिळत नसल्याने प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहमदनगर यांच्या कार्यालयात ऊस उत्पादक शेतकर्यांची बैठक पार पडली. यामध्ये साखर कारखान्याकडून 6 मे पर्यंत थकित पेमेंट ऊस उत्पादक शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे लेखी पत्र प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना दिल्याने गुरुवारचे (दि.4 मे) जिल्हाधिकारी कार्यालया समोर ऊस उत्पादक शेतकर्यांनी पुकारलेले भजन आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
यु.टेक (एस.जी.एम.एस.एल.) श्री गजानन महाराज साखर कारखाना कौठे मलकापूर (ता. संगमनेर) यांनी पारनेर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांनी चार महिन्यापूर्वी ऊस दिला होता. पारनेरचा देवी भोयरे साखर कारखाना चांगल्या स्थितीमध्ये असता, तर ही वेळ शेतकर्यांवर आली नसती. मोठ्या विश्वासाने शेतकर्यांनी कारखान्याला ऊस पाठविला. 2 एप्रिल रोजी पेमेंट न मिळाल्यास शेतकर्यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यानंतर संचालकांनी 20 एप्रिल पर्यंत पेमेंट देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र अद्याप पर्यंत पेमेंट देण्यात आलेले नाही. कारखान्याचे मालक व व्यवस्थापनाला सातत्याने चार महिन्यापासून संपर्क करूनही उसाचे पेमेंट न देता शेतकर्यांची फसवणूक व चेष्टा केली जात असल्याचा आरोप करुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत भजन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

या पार्श्वभूमीवर प्रादेशिक सहसंचालक (साखर) मिलिंद भालेराव यांनी ऊस उत्पादक शेतकर्यांची बुधवारी (दि.3 मे) बैठक घेऊन या प्रश्नावर चर्चा केली. या बैठकीसाठी साखर कारखान्याकडून कोणताही प्रतिनिधी उपस्थित नव्हता, मात्र कारखान्याकडून लेखी पत्राने 6 मे पर्यंत थकित पेमेंट ऊस उत्पादक शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे कळविले असल्याचे भालेराव यांनी स्पष्ट केले. तर याबाबत लेखी देऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली असता, गुरुवारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली होणारे आंदोलन ऊस उत्पादक शेतकरी यांनी स्थगित केले आहे.
या बैठकीसाठी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशचे राज्य उपाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर, धनेश्वर लोंढे, बाळासाहेब लोंढे, प्रदीप रोहोकले, रामा पानमंद, नारायण गागरे, पोपट डुकरे, पांडूरंग पठारे आदींसह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. आश्वासन देऊनही थकित पेमेंट न दिल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रघुनाथ आंबेडकर यांनी दिला आहे.