जबाबदार नेत्यांवर मनुष्य वधाचे गुन्हे दाखल करा
भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- 16 कोटी रुपये खर्चून महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या मुंबई जवळील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार आयोजनाच्या ढिसाळ कारभाराने वीस पेक्षा जास्त नागरिकांचा जीव गेला असताना या कार्यक्रमासाठी जबाबदार असणारे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा व तिघांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामे देण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कौन्सिलच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती पक्षाचे राज्य सचिव कॉ. अॅड. सुभाष लांडे यांनी दिली.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात घडलेल्या हृद्यद्रावक घटनेत वीस पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शेकडो नागरिक जखमी असून, असह्य वेदनेने विव्हळत आहेत. यामध्ये मृत व जखमींची संख्या वाढत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच केंद्रीय गृहमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या या सोहळ्यात हा गंभीर प्रकार घडला आहे.
2024 च्या निवडणूका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतसे देशाच्या व राज्याच्या सत्तेत असलेल्या धर्मांध, जातीय सरकारने सर्वसामान्य धार्मिक जनतेच्या देवभोळेपणाचा, धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेणे जोमाने सुरू केले आहे. स्वतःला पुन्हा सत्ता मिळावी म्हणून कोट्यवधी रूपये खर्चून बाबा, बुवा, बापू यांचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. तर सामान्य, बहुजन व कष्टकरी जनतेला वेठीस धरले जात आहे. खारघरचा कार्यक्रमही याचाच एक भाग होता, असा आरोप भाकपच्या वतीने करण्यात आला आहे.
या पूर्वीचे बहुतेक महाराष्ट्र भूषण पुरस्कार बंद सभागृहात मध्ये दिले गेले. मात्र 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासकीय पैशातून सर्वसामान्यांचा जीव वेठिला लाऊन राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रकार करण्यात आला आहे. यामुळे 20 जणांना जीवाला मुकावे लागले आहे. खारघर येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याला भाजप ने राजकीय स्वरूप दिल्याने लाखो लोक उपस्थित राहणार हे माहीत असूनही आयोजनाच्या ढिसाळ व नियोजन शुन्यतेमुळे या वेळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत उष्माघाताने व चेंगराचेंगरीत अनेकजण मरण पावले व जखमी झाले आहेत.
25 लाख रुपये पुरस्काराची रक्कम असलेल्या कार्यक्रमासाठी लाखो जमणार होते व कडकडीत उन्हात या कार्यक्रमाचे आयोजन करताना सावलीची, पाण्याची व काही आपत्ती आल्यास तातडीच्या उपायाची सोय देखील करण्यात आली नव्हती. तेथे तातडीची वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. या कार्यक्रमासाठी राज्याच्या तिजोरीतून सुमारे 16 कोटी रुपये कशावर खर्च करण्यात आले? याचा हिशेब जनतेला दिला पाहिजे अशी मागणी भाकपने केली आहे.
मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ज्यांच्या साठी भक्त आले होते, त्या ट्रस्टमधून व सत्ताधारी नेत्यांच्या तिजोरीतून प्रत्येकी 25 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, सर्व जखमींना योग्य व ते पूर्ण बरे होई पर्यंत उपचार मिळाव, देशाचे व राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हे मृत्यू कांड घडलेले असल्याने सर्व घटनेची तटस्थ यंत्रणेकडून चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली असल्याचे कॉ. लांडे यांनी म्हंटले आहे.