नगरसेविका शिला चव्हाण व काँग्रेसचे कमिटीचे राज्य सचिव दीप चव्हाण यांचे आयुक्तांना निवेदन
इतर उद्यानात म्युझिकल फाउंटन उभारत असताना मध्यवर्ती असलेल्या उद्यानाच्या दुरावस्थेकडे लक्ष द्यावे -दीप चव्हाण
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर सौंदर्यकरण व माजी वसुंधरा अभियान 3.0 योजनेतून मिळालेल्या 11 कोटी बक्षिसातून शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू पुतळ्याचे सुशोभीकरण करुन या परिसरातील बंद पडलेले उद्यान पुनर्जीवित करण्याची मागणी नगरसेविका शिला चव्हाण व काँग्रेसचे कमिटीचे राज्य सचिव दीप चव्हाण यांनी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लालटाकी येथील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पुतळा आहे. परंतु दुर्दैवाने सदर पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याकडे दुर्लक्ष झाले असून, येथील उद्यानाची मोठी दुरावस्था होवून ते बंद पडले आहे. शहर सौंदर्यकरण स्पर्धेत अहमदनगर महापालिकेला राज्यात तिसरे व माजी वसुंधरा अभियानात राज्यात दुसरे असे दोन पुरस्कार मिळालेले आहेत. मोकळ्या जागेत उद्यान विकसित करणे व सुशोभीकरण करण्यासाठी या पुरस्कारातून महापालिकेला 11 कोटी रुपये मिळाले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू पुतळ्याची व उद्यानाची झालेली मोठी दुरावस्था खेदाची बाब आहे.
तत्कालीन नगर परिषदेने शहराच्या विकासाच्या व सुशोभीकरणाच्या दृष्टीने पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान विकसित केले होते. त्यामध्ये नेहरुजींच्या पूर्ण कृती पुतळ्यासह गुलाबाच्या फुलांची बाग, पुतळ्यालगत कारंजे, पायर्यावर पाण्याचे धबधबे व चारही बाजूंनी संरक्षक भिंत होती. तसेच आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आलेली होती. परंतु दुर्देवाने आज या पुतळ्या लगतच्या परिसरात अतिक्रमण झालेले असून, संरक्षक भिंती पडल्या आहेत. मोठ्या प्रमाणात अंधाराचा फायदा घेत अवैध धंदे सुरू आहे. तर पुतळ्याची देखील दुरावस्था झाली असून, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
महापालिकेला मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून हा उद्यान पुनर्जीवित करण्यात यावा. उद्यानाचे सुशोभीकरण करुन, बाग विकसित करण्यात यावी, कारंजा सुरू करुन पायर्यावरील पाण्याचे धबधबे सुरू करावे व आजूबाजूच्या परिसरात लाईटीची व्यवस्था करुन उद्याना भोवती संरक्षक भिंत बांधावी, या कामासाठी 75 ते 80 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी चव्हाण यांच्याकडून करण्यात आली आहे.
गंगा उद्यान येथे म्युझिकल फाउंटन होत असून, बुरुडगाव, साईनगर येथे देखील साई उद्यानात म्युझिकल फाउंटन होत आहे. या धर्तीवर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानाचे सुशोभीकरण केल्यास शहराच्या सौंदर्यामध्ये निश्चितच भर पडणार असल्याचे दीप चव्हाण यांनी म्हंटले आहे.