चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष खामकर यांनी वेधले लक्ष
अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या वतीने छत्रपती संभाजी नगर येथे महिलेवर सामुदायिक अत्याचार करुन तिचा खून करणार्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व पिडीत महिलेच्या कुटुंबाचे पुनर्वसन करुन आर्थिक मदत द्यावी व महिलेच्या मुलांची शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी दिले.
पारनेर तालुक्यातील वनकुटे येथे अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे झालेल्या नुकसानची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आले असता त्यांना सदरचे निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, चर्मकार विकास संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, अरुण गाडेकर आदी उपस्थित होते.
छत्रपती संभाजी नगरला नुकतेच चर्मकार समाजातील एका महिलेवर काही नराधमांनी अत्याचार करून निर्घुणपणे खून केला. या प्रकारामुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून, महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देवून आरोपींना कठोर शिक्षा होण्याचे निवेदनात म्हंटले आहे. सदर कुटुंबाला शासनाकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले असल्याची माहिती खामकर यांनी दिली.