• Sat. Mar 15th, 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती राष्ट्रीय देशसेवा दिवस म्हणून साजरी

ByMirror

Apr 14, 2023

इंडिया अगेन्स्ट तमस् स्लेव्हरी संघटनेच्या वतीने दिल्लीगेट वेस समोर बाबासाहेबांचा जयघोष

लोकभज्ञाक मतफत्ते आणि गुट्टलबाज सत्ता पेंढार्‍यांविरुध्द डिच्चूफत्ते या देशसेवेचा स्विकार करण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- इंडिया अगेन्स्ट तमस् स्लेव्हरी संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रीय देशसेवा दिवस म्हणून साजरी करण्यात आली. हजारो वर्ष तमस चेतनेच्या गुलामगिरीत जोखडलेल्या नागरिकांना बाबासाहेबांनी उन्नत चेतना पर्वात आणले, त्यांच्या सन्मानार्थ शहरातील ऐतिहासिक दिल्लीगेट वेस समोर संघटनेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. तर जनतेने लोकभज्ञाक मतफत्ते आणि गुट्टलबाज सत्ता पेंढार्‍यांविरुध्द डिच्चूफत्ते या देशसेवेचा स्विकार करण्याचे आवाहन करण्यात आले.


जय शिवाजी… जय डिच्चूकावा, जय गिताभारत… जय डिच्चूकावा अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. या मोहिमेत अ‍ॅड. कारभारी गवळी, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, ओम कदम, आशा शिंदे, छायाताई धनवे, प्रा. प्रमोद शिंदे, अंकिता धनवे, प्रदिप मधे, तुकाराम बोरगे, बहिरनाथ शिंदे, अण्णाजी मधे, परिणीती कांबळे, तुकाराम बोरगे आदी सहभागी झाले होते.


देशातील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये गुट्टलबाज सत्तापेंढारी मतदारांना खोटी आश्‍वासने देऊन, मतासाठी पैसे मोजून व जातीधर्माच्या नावावर मते घेतली. अशा सत्तापेंढारींनी मागच्या दाराने सत्ता मिळवून जनतेची तिजोरी घरी वाहून नेली. त्यामुळे देशातील भ्रष्टाचार, अनागोंदी, टोलवाटोलवी, झोपडपट्ट्या, बेकारी, स्त्रीयांवरील अत्याचार, धर्मांधता वाढली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.


अ‍ॅड. कारभारी गवळी म्हणाले की, माहिती तंत्रज्ञानाबरोबर देशात उन्नत चेतना स्विकारली गेली, तरच या देशाला चांगले दिवस येऊ शकणार आहेत. अन्यथा वर्षानुवर्षे जिकडे तिकडे टक्केवारी आणि अनागोंदी कायम राहणार आहे. देशात प्रजासत्ताक स्विकारले गेले, परंतु देशातील 70 टक्के जनता आजही तमस चेतनेखाली वावरत असल्यामुळे गुट्टलबाज सत्तापेंढार्‍यांचे पेव फुटले आहे. त्यामुळे भारतीय संविधानाबरोबरच या देशात उन्नत चेतना पर्व राबविण्याची अत्यंत गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *