अठरा वर्षात 35 हजार महिला, युवती व युवकांना दिले व्यावसायिक प्रशिक्षण
जन शिक्षण संस्थेने महिलांना आत्मनिर्भर करुन रोजगाराचा मार्ग दाखविला -हनिफ शेख
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला व युवतींमध्ये रोजगार कौशल्य निर्माण करण्याचे काम जन शिक्षण संस्थेने केले. महिलांना आत्मनिर्भर करुन रोजगाराचा मार्ग दाखविण्याचे कार्य अविरतपणे संस्था करत आहे. अनेक महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहून कुटुंबाची प्रगती साधली. महिलांनी स्वतःचे कौशल्याची आवड ओळखून त्या क्षेत्राचे व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर होण्याचे आवाहन स्नेहालयाचे सहसंचालक हनिफ शेख यांनी केले.

भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (नवी दिल्ली) संचलित शहरातील जनशिक्षण संस्थेच्या अठराव्या वर्धापन दिनानिमित्त महिला व युवतींसाठी कौशल्यक्षम प्रशिक्षण व रोजगाच्या संधी या विषयावर आयोजित मार्गदर्शन व्याख्यानात हनिफ शेख बोलत होते. यावेळी व्यवस्थापकीय कमिटीचे व्हाईस चेअरपर्सन मनीषा शिंदे, सदस्या पूजा देशमुख, संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, कार्यक्रम सल्लागार समिती सदस्य कमल पवार, कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे, प्रशिक्षिका माधुरी घाटविसावे, लेखापाल अनिल तांदळे, उषा देठे, विजय बर्वे आदींसह प्रशिक्षणार्थी युवती व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पुढे हनिफ शेख म्हणाले की, सर्वांच्या जीवनात समस्या असतात, त्या समस्यांपुढे न डगमगता मार्ग काढून स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे लागते. महिलांनी मोठी स्वप्न पाहून, ते स्वप्न साकार करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिल्यास यश निश्चित मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात बाळासाहेब पवार म्हणाले की, संस्थेची अठरा वर्षाची वाटचाल संस्थापक अध्यक्ष डॉ. राधेश्याम गुंजाळ व चेअरमन राहुल गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीमय राहिली आहे. नगर जिल्ह्यात 35 हजार महिला, युवती व युवकांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम करण्यात आले. ग्रामीण भागात देखील गावी-गावी जाऊन प्रशिक्षणाची व्यवस्था करून देण्यात आली आहे. जनशिक्षण संस्था कौशल्यक्षम भारत घडविण्यासाठी योगदान देत आहे. सरकारी प्रशिक्षण असले, तरी अद्यावत प्रशिक्षणाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मनीषा शिंदे म्हणाल्या की, स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महिलांनी कौशल्यक्षम प्रशिक्षणाने आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला पाहिजे. महिला आत्मनिर्भर झाल्यास कुटुंबाची व समाजाची प्रगती होणार असून, यासाठी त्यांच्यामधील कौशल्य विकसित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
पूजा देशमुख यांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेताना धरसोड वृत्ती न करता एकाच क्षेत्रात पारंगत होऊन वाटचाल करण्याचे सांगितले. कमल पवार यांनी जन शिक्षण संस्थेचा वटवृक्ष बहरला असून, त्याची सावली सर्वसामान्य वर्गातील युवक-युवतींना मिळत आहे. त्यांना रोजगार निर्माण करून देण्याचे कार्य संस्था सक्षमपणे करत असल्याचे त्यांनी सांगितले. महागड्या व्यावसायिक प्रशिक्षणाचे कोर्स अल्प दरात जनशिक्षण संस्थेत उपलब्ध आहे.
हे प्रशिक्षण दर्जेदार पद्धतीने शिकवले जात असून, महिला-युवतींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य सुरु असल्याचे प्रशिक्षणार्थी युवती व महिलांनी यावेळी भावना व्यक्त केली.