चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष खामकर यांनी मंत्रालयात सचिवांपुढे मांडले प्रश्न
लवकरच मुख्यमंत्री व संबंधित विभागाच्या अधिकार्यांची संयुक्त बैठकीचे आश्वासन
अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार समाजाच्या विविध प्रश्नासंदर्भात सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्याबरोबर चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली. तर विविध प्रश्नांचे निवेदन दिले असता, भांगे यांनी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संबंधित विभाग व प्रमुख पदाधिकार्यांची बैठकीचे आयोजन केले जाणार असल्याचे आश्वासन दिले.
सामाजिक न्याय विभागाचे सचिव भांगे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत संत रविदास महाराज यांच्या जयंतीची शासकीय सुट्टी महाराष्ट्र राज्यात देण्यात यावी, महाराष्ट्रात संत रविदास विश्वविद्यालयाची स्थापना करून संत रविदास महाराजांचे साहित्य व सांस्कृतिक विभाग करण्यात यावा, प्रत्येक जिल्ह्यात अद्यावत संत रविदास विकास केंद्र स्थापन करण्यात यावे, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून खर्या गरजवंत लाभधारकांना मिळणार्या योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यासाठी योग्य नियोजन करावे, सामाजिक न्याय विभागाची भ्रष्टाचाराचा डाग लागलेली ट्रॅक्टर योजना रद्द करून नव्याने युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याकरिता टेम्पो योजना सुरू करण्याची मागणी त्यांच्याकडे करण्यात आली.
तसेच शासनाने कष्टकरी गटई स्टॉल देताना अपघात विमा, आरोग्य विमा, घरकुल योजना व पेन्शन योजना लागू करण्यात यावा. गटई स्टॉल पीच परवाना महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत गाव पातळीवर देण्यात यावा. गटई स्टॉल नव्याने सुधारणा करून आकारमान वाढवण्यात यावे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील गटई स्टॉल संदर्भात सुप्रीम कोर्टात असलेली केस शासनाने हस्तक्षेप करून मार्गी लावावी व नव्याने पीच परवाने व गटई स्टॉल देण्यात यावेत. संत रोहिदास चर्मकार कल्याण आयोगाला स्वतंत्र दर्जा देण्यात यावा तसेच निधी सुद्धा स्वतंत्रपणे उपलब्ध देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
महिलांना स्वयंपूर्ण करण्याकरिता विविध प्रकारचे मोफत प्रशिक्षण देऊन बचत गट तसेच वैयक्तिक उद्योग व्यवसाय उभारणीस कमी व्याज दराने भांडवल उपलब्ध करून द्यावे. युवकांना शासनाच्या विविध उद्योग व्यवसायाच्या योजनेतून अद्ययावत मोफत प्रशिक्षण देऊन उद्योग व्यवसायाकरिता एमआयडीसी क्षेत्रात जागेसह बीज भांडवल उपलब्ध करून द्यावे. विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्तीचा विषय महत्त्वाचा असून, विद्यार्थी व पालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते यासंदर्भात मिळणारी शिष्यवृत्तीची अडचण दूर करून वेळेवर देण्यात यावी. महामंडळाच्या देवनार येथील जागेत लेदर पार्क उभारण्यात यावे व प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांना अद्यावत हॉस्टेल तसेच जागतिक दर्जाचे लेदर मार्केट करण्यात यावे. मागील तीन वर्षाचे संत रोहिदास पुरस्कार ताबडतोब सन्मानपूर्वक वितरित करण्यात यावे. चर्मउद्योग महामंडळाचे कर्जदारांचे कर्ज सरसकट माफ करावे आदींसह विविध मागण्या व प्रश्नांवर चर्मकार विकास संघाच्या वतीने खामकर यांनी लक्ष वेधले.
सामाजिक न्याय विभागाचे सचिव भांगे यांनी सर्व प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सर्व योजनांचा लाभ मिळण्यासाठी सामाजिक न्याय विभाग काम करणार असल्याचे स्पष्ट केले. तर हे प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये चर्मकार विकास संघ, सामाजिक न्याय विभाग, चर्मोद्योग महामंडळ यांची संयुक्त बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगितले.
