जल जीवन मिशनची कार्य, उद्दीष्ट व फायद्याचा उलगडा
भविष्याच्या पाणी नियोजनावर उज्वल भविष्य अवलंबून -अॅड. विजय जाधव
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद जल जीवन मिशन कक्षच्या वतीने केडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दोन दिवसीय ग्रामस्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यशाळेला प्रारंभ झाले. या कार्यशाळेस सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका व मदनीस यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यशाळेसाठी प्रशिक्षण समन्वयक अॅड. विजय जाधव, यशदाच्या प्रशिक्षिका नुतन उरमुडे, नगर तालुका पंचायत समितीचे स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे तागडकर, वाळके, सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, ग्रामसेवक श्रीपत फलके, नितीन नेमाने, सरपंच युवराज कार्ले, लता फलके, प्रतिभा शिंदे, सुलभा जाधव, अनिता झरेकर, भाऊसाहेब बोरुडे, ग्रामसेवक शेख, रामदास भोंडवे, लालभाई शेख, रामभाऊ आबुज आदी उपस्थित होते.

अॅड. विजय जाधव म्हणाले की, भविष्याच्या पाणी नियोजनावर उज्वल भविष्य अवलंबून आहे. पाणीचे नियोजन न केल्यास भविष्यात पाण्यासाठी गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागणार आहे. देशामध्ये नळाला मीटर बसविण्याचा संकल्प असून, त्यामुळे पाण्याची उधळपट्टी होणार नाही. ग्रामीण कुटुंबासाठी पिण्यासाठी मुबलक व शुध्द पाणी मिळण्याचे धोरण यामध्ये समाविष्ट आहे. तर वैयक्तिक नळ कनेक्शनद्वारे शुद्ध, सुरक्षित आणि पुरेसे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
नुतन उरमुडे म्हणाल्या की, जगात पिण्या योग्य पाणी साठा अत्यंत कमी असून, त्याचे काळजीपूर्वक वापर झाला पाहिजे. पर्यावरणाच्या गंभीर समस्यांना तोंड देण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धन हा एकमेव पर्याय आहे. पर्यावरणाचे समतोल साधले गेल्यास योग्यवेळी पुरेशा प्रमाणात पाऊस होणार आहे. जल जीवन मिशनच्या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि जलसंधारणाच्या कामांचा देखील समावेश आहे. शक्य तितका कमी अपव्यय करताना पाण्याची बचत करणे हा या अभियानाचा प्राथमिक उद्देश आहे. देशातील प्रत्येकाला समान प्रमाणात पाणी मिळावे, यासाठी जलसंपत्तीचे व्यवस्थापन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, पाणी हेच जीवन असून, यापुढे पाणीदार गावांचा विकास साधला जाणार आहे. गाव पातळीवर पाण्याचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. पाणी बचत लोकचळवळ करण्याच्या उद्देशाने जल जीवन मिशन कार्यान्वीत करण्यात आली आहे. शेतीसाठी बंधारे घ्यावे, बोरवेल घेतल्याने जमीनीच्या पाण्याची पातळी घटत चालली आहे. त्यामुळे पिकांना देखील अडचण निर्माण होत आहे. या अभियानातून जनजागृतीने पाणीदार गावांसाठी चळवळ उभी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.