जेएसएस गुरुकुलच्या माध्यमातून सुसंस्कारी पिढी घडविली जात आहे -इंद्रभान डांगे
अहमदनगर (प्रतिनिधी)- संस्कारक्षम व गुणसंपन्न पिढी घडविणार्या जेएसएस गुरुकुलच्या सोनेवाडी रोड, केडगाव येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन डांगे पॅटर्नचे प्रणेते इंद्रभान डांगे यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योजक संतोष गुगळे, पारनेर पब्लिक स्कूलचे संचालक गीताराम म्हस्के, वसंत बोरा, विजयकुमार बळगट, सुभाषलाल भंडारी, जवाहरलाल कटारिया, सुरेश कटारिया, सुजित डोंगरे, गुलाब कटारिया, संचालक आनंद कटारिया, संचालिका निकिता कटारिया आदींसह विद्यार्थी, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इंद्रभान डांगे म्हणाले की, शाळांमधून शिक्षण मिळते, पण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना संस्काराची गरज निर्माण झाली आहे. त्या दृष्टीने जेएसएस गुरुकुलच्या माध्यमातून सुसंस्कारी पिढी घडविण्याचे काम सुरु आहे. कर्तृत्व संपन्न पिढी या वास्तूच्या माध्यमातून घडणार आहे. शाळेची उत्तम इमारत बांधली जाणार असून, शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा देखील मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संचालक आनंद कटारिया म्हणाले की, विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी शिक्षण न देता, त्यांना सक्षम नागरिक घडविण्याच्या दृष्टीकोनाने जेएसएस गुरुकुल कार्य करत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणाला संस्कार व कौशल्य निर्माणाची जोड देऊन एकविसाव्या शतकातील विद्यार्थी घडविला जात आहे. विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षणाबरोबरच भौतिक सुविधा देखील निर्माण करून देण्याचा प्रयत्न असून, त्या दृष्टीने शाळेची भव्य इमारत उभी राहत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गीताराम म्हस्के म्हणाले की, भविष्यातील पिढी घडविणारी वास्तू उभी राहत आहे. या शाळेच्या माध्यमातून सक्षम समाज निर्मिती होणार असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योजक संतोष गुगळे व वसंत बोरा शाळेला सर्व परीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संचालिका निकिता कटारिया यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन शाळेच्या कला, क्रीडा व शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. कटारिया परिवाराच्या वतीने आभार मानण्यात आले.