महापालिका आयुक्तांना शिवगाळ व बेजबाबदार, आक्षेपार्ह वक्तव्याचा संताप व्यक्त
जातीय व धार्मिक द्वेष निर्माण करण्यासाठी देश विघातक वक्तव्य -एन.एम. पवळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरामध्ये येऊन महानगरपालिकेच्या आयुक्तांना शिवगाळ करत बेजबाबदार व आक्षेपार्ह वक्तव्याचा महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला.
जिल्हा परिषदेतील कास्ट्राईबच्या कार्यालयात राज्याध्यक्ष एन.एम. पवळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राणे यांच्या निषेधाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी राज्य महासचिव सुहास धीवर, राज्य उपाध्यक्ष वसंत थोरात, महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई भिंगारदिवे, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, श्याम गोडळकर, सतीश केळगंद्रे, श्याम थोरात, दत्ता रणसिंग, पी.पी. खंडागळे, चंद्रशेखर वांढेकर आदी उपस्थित होते.
राज्याध्यक्ष एन.एम. पवळे म्हणाले की, चुकीचे वक्तव्य करुन अधिकारी, कर्मचारी यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचे काम आमदार राणे यांनी केले आहे. आमदार म्हणून त्यांना नागरिकांचे प्रश्न मांडण्याचे अधिकार जरूर आहेत, परंतु त्यांचे प्रश्न मांडण्याचे ठिकाण व पध्दत चुकीचे आहे. शहरामध्ये येऊन त्यांनी जातीय व धार्मिक द्वेष निर्माण करण्यासाठी देश विघातक वक्तव्य केले आहे. त्यांच्या अशा वागण्यामुळे समाज जोडणे ऐवजी समाज तोडण्याचे काम होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्य महासचिव सुहास धीवर यांनी अतिक्रमण काढणे हा भाग प्रशासनाचा असून, येथील प्रशासन अतिक्रमण काढण्यासाठी सक्षम आहे. लोकप्रतिनिधींनी अतिक्रमणाबाबत हस्तक्षेप केल्यास शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांचे पद देखील धोक्यात येऊ शकते. सामाजिक प्रश्नांची सोडवणुकी प्रशासकीय पद्धतीने झाले पाहिजे, त्याला कोणत्याही राजकीय व धार्मिक बाजूने पाहू नये, असे सांगितले. यावेळी उपस्थित कर्मचारी व पदाधिकारी यांनी याबाबत तीव्र भावना व्यक्त करून राणे यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध केला.