सोप्या पध्दतीने महिलांना जाणल्या पौष्टिक व सकस आहाराच्या रेसिपी
किचन क्वीन दिपाली बिहाणी यांचे मार्गदर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील आर्टिस्ट रसोई स्टुडिओच्या वतीने घेण्यात आलेल्या निशुल्क कुकिंग रेसिपी कार्यशाळेला शहरातील महिला व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. किचन क्वीन दिपाली बिहाणी यांनी महिलांना कुटुंबाच्या आरोग्यासाठी पौष्टिक व सकस आहाराच्या रेसिपी सांगितल्या.

गुलमोहर रोड येथील हॉटेल सायंतारा मध्ये मोठ्या संख्येने महिलांच्या उपस्थितीमध्ये ही कार्यशाळा पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका रुपाली वारे, संध्या पवार, माहेश्वरी समाजाच्या गिता गिल्डा, अलकाताई मुंदडा, शारदा पोखरकर, अनुप्रिती झंवर, वैशाली मालपाणी, अस्मिता आष्टेकर, नुतन शिंदे, रचना काकाणी, कविता भंडारी उपस्थित होत्या.
दिपाली बिहाणी यांनी पौष्टिक रेसिपी, मिलेट, फ्युजन व सिझलर रेसिपी तसेच कोल्ड्रिंक, वेलकम ड्रिंक्स, केक, आईसिंगसह विविध रेसिपी प्रात्यक्षिकासह दाखविले. लज्जतदार व स्वादिष्ट विविध खाद्य पदार्थ या कुकिंग रेसिपी कार्यशाळेच्या माध्यमातून समोर आले. बदलत्या ऋतूनुसार आहारात देखील बदल आवश्यक असून, ऋतूनुसार योग्य आहार घेतल्यास उत्तम आरोग्य टिकून राहत असल्याचे बिहाणी यांनी सांगितले. पदार्थ दिसायला देखील चांगले असले पाहिजे, खाण्यापूर्वी ते डोळ्यांनी पाहिले जाते. यासाठी त्याची मांडणी देखील आकर्षक राहण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले.

नगरसेविका रुपाली वारे यांनी हॉटेलपेक्षा घरगुती अन्न-पदार्थ आरोग्यासाठी चांगले असते. ते अधिक चांगले बनविण्यासाठी युवतींनी विविध कुकिंगच्या रेसिपी शिकण्याची गरज असून, बिहाणी यांनी महिलांना ही संधी मोफत उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. अलकाताई मुंदडा यांनी महिलांसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.