गरजूंना आधार देणे हाच माणुसकी धर्म -आ. निलेश लंके
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त काव्य संमेलनात आमदार निलेश लंके यांना स्वराज्य भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.
नगर-कल्याण रोड वरील अमरज्योत लॉन मध्ये झालेल्या या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी आमदार लंके यांना पुरस्कार दिला. यावेळी लेखक गिताराम नरवडे, जयश्री सोनवणे, सुनिलकुमार धस, अक्षरा येवले, मंदाताई डोंगरे आदी उपस्थित होते.
आमदार निलेश लंके म्हणाले की, कवितेतून समाजातील वास्तवतेचे दर्शन घडत असते. तर लेखक हा समाजाला आरसा दाखविण्याचे काम करतो. कवी संमेलनातून सामाजिक कार्याचा झालेला जागर कौतुकास्पद आहे. सामाजिक कामातून माणसाची एक वेगळी ओळख निर्माण होते. केलेल्या कामाची व त्यागाची सर्वसामान्य जनता दखल घेत असते. गरजूंना आधार देणे हाच माणुसकी धर्म असल्याचे त्यांनी सांगितले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, कोरोनाकाळात कोविड सेंटर उभारुन आमदार लंके यांनी गोर-गरीबांना आधार दिले. तर मतदार संघात प्रलंबीत विकास कामे मार्गी लाऊन लोकनेता म्हणून ते पुढे आले आहे. राजकारणापेक्षा सर्वसामान्यांचे हित पाहून लंके यांनी उभे केलेले कार्य प्रेरणादायी असून, त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची दखल घेऊन संस्थेच्या वतीने त्यांना स्वराज्य भूषण पुरस्कार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.