• Fri. Mar 14th, 2025

आपचे जिल्हा परिषद शिक्षण विभागा समोर निदर्शने

ByMirror

Jun 27, 2023

आरटीईची रकमेची परिपूर्ती तातडीने करण्याची मागणी

गरीब मुलांना शाळा शिकू द्या -प्रा. अशोक डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलांना आरटीई अंतर्गत मोफत शिक्षण मिळण्यासाठी विविध शाळांच्या आरटीईची रकमेची परिपूर्ती करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हा परिषदेत निदर्शने करण्यात आली.


मागील चार वर्षापासून आरटीई अंतर्गत गरजू घटकातील मुलांना मोफत शिक्षण देणार्‍या शाळांचे अठराशे कोटी रुपये थकित आहे. सरकार ही रक्कम अदा करत नसल्याने आरटीई अंतगर्त प्रवेश देण्यास सर्वसामान्यांना त्रास होत असून, गरीब वंचित घटकातील मुलांना सरकारच्या वेळकाढूपणाचा फटका बसत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या आंदोलनात शहर जिल्हा संघटक प्रा. अशोक डोंगरे, कार्याध्यक्ष भरत खाकाळ, अ‍ॅड. विद्याताई शिंदे, गणेश मारवाडे, प्रकाश फराटे, सुभाष पवार, विक्रम क्षीरसागर आदी सहभागी झाले होते.


एकीकडे राजकीय नेते मंडळीच्या मुलांचे शिक्षण इंटरनॅशनल स्कूलमध्ये व परदेशात सुरु आहे. परंतु सरकार गरीब, वंचित घरातील मुलांचे शिक्षण व्हावे यासाठी निधी देत नाही. सर्वांना मोफत शिक्षण फक्त घोषणा देऊन त्यावर कोणत्याही प्रकारची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. संविधानाने दिलेल्या शिक्षण हक्काची पायमल्ली होत आहे. राज्य सरकारने तातडीने आरटीईची रकमेची परिपूर्ती करुन गरीब मुलांना शाळा शिकू द्यावे, अशी भावना शहर जिल्हा संघटक प्रा.अशोक डोंगरे यांनी व्यक्त केली.


महाराष्ट्रातील खाजगी शाळांमध्ये वंचित आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील पालकांचे 1 लाख मुले दरवर्षी शिक्षण हक्क कायद्यातंर्गत प्रवेश घेतात. सध्या 22-23 शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून, शासनाकडून गेल्या चार वर्षातील सुमारे अठराशे कोटी रुपये एवढी रक्कम शाळांना न दिल्यामुळे अनेक ठिकाणी शाळा अडचणीत आल्या आहेत. दरवर्षी शासन दिरंगाई करीत असल्याने मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. यंदा पुन्हा तशीच वेळ आली असल्याचा आरोप कार्याध्यक्ष भरत खाकाळ यांनी केला. या मागणीचे निवेदन प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना देण्यात आले. शाळांच्या आरटीई रकमेची परिपूर्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आपच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *