शिक्षकेतर कर्मचार्यांच्या पाच वर्षाच्या संघर्षाला यश
अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांना 31 मे रोजी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पुर्ववत चालू करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केले आहे. शिक्षकेतर कर्मचार्यांच्या पाच वर्षाच्या संघर्षाला यश आले असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ अध्यक्ष वैभव रोडी, उपाध्यक्ष बाळासाहेब इघे, सचिव संतोष कानडे यांनी दिली.
सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पुर्ववत सुरु झाल्याने शिक्षकेतरांची वसुली थांबेल व वेतनवाढ होवून पेन्शनधारक शिक्षकेतर कर्मचारी यांना देखील लाभ होणार आहे. सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना 15 फेब्रुवारी2011 व 28 डिसेंबर 2010 च्या शासननिर्णय आदेशानुसार सुरु झाली होती. परंतु वित्त विभागाची परवानगी न घेता शासन आदेश लागू केल्याने 7 डिसेंबर2018 व 16 फेब्रुवारी 2019 शासन आदेशानंतर रद्द करण्यात आली होती. यानंतर राज्यातील सर्व संघटना एकत्रित येऊन सेवक संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून एकत्र आल्या व त्यांनी कामबंद, लाक्षणिक संप, बेमुदत संप, निदर्शने, मोर्चे आंदोलने केली. जवळपास पाच वर्षाच्या संघर्षानंतर हे यश प्राप्त झाले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हा आदेश निर्गमित होण्यासाठी महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे मार्गदर्शक उमरगा मतदार संघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी अत्यंत महत्त्वाचे प्रयत्न केले. तसेच वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सेवक संयुक्त कृती समितीच्या वतीने आभार मानण्यात आले आहे.
हा लढा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीचे मुख्य संघटक अजय देशमुख, महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघ अध्यक्ष प्रकाश म्हसे, महासचिव रावसाहेब त्रिभुवन, मिलिंद भोसले, नितीन कोळी, दिपक मोरे, सुनील धिवार, कैलास पाथ्रीकर, संदिप हिवरकर, केतन कान्हेरे, अंकुश आनंदा यांच्यासह अनेक पदाधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या निर्णयाने शिक्षकेतर कर्मचारींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.