वंचितांचे जीवन आनंदी करण्यासाठी त्यांना आपल्या आनंदात सामावून घ्यावे -अनिता काळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्त्या तथा मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे पाटील यांनी आश्रमातील निराधार मुलांसह आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यापेक्षा वंचितांच्या चेहर्यावर समाधान फुलविण्यासाठी काळे यांनी हा उपक्रम राबविला.
मराठा लाईफ फाऊंडेशनच्या (वसई) आश्रमात झालेल्या या कार्यक्रमासाठी फाऊंडेशनचे लोखंडे सर, अनिता काळे, विद्याताई गडाख, रीना जाधव, निष्ठा सुपेकर, आभास सुपेकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात लोखंडे म्हणाले की, अनिता काळे यांचे सुरु असलेले सामाजिक कार्य प्रेरणादायी आहे. वंचितांबरोबर आनंद द्विगुणीत करुन त्यांनी इतरांसाठी एक प्रेरणा निर्माण केली असल्याचे त्यांनी सांगितले.
अनिता काळे म्हणाल्या की, निराधार व वंचितांना मराठा लाईफ फाऊंडेशनच्या आश्रमामुळे आधार मिळाला आहे. दोनशेपेक्षा अधिक लहान मुले, वृध्द व महिला या आश्रममध्ये आहेत. वंचितांचे जीवन आनंदी करण्यासाठी त्यांना आपल्या आनंदात सामावून घेण्याचे त्यांनी आवाहन केले.