अहमदनगर(प्रतिनिधी)- सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रच्या वतीने आदर्शगाव हिवरेबाजार येथे झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात गावाच्या विकासासाठी निस्वार्थ भावनेने सामाजिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, पर्यावरण, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणारे निमगाव वाघाचे ग्रामपंचायत सदस्य तथा नगर तालुका सरपंच परिषदेचे सचिव पै. नाना डोंगरे यांचा सन्मान करण्यात आला.
गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांच्या हस्ते डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री पोपट पवार, आमदार निलेश लंके, आमदार सुरेश धस, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, सचिव विकास जाधव, उपाध्यक्ष अश्विनी थोरात, जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे आदी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते पै.नाना डोंगरे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून त्यांचे विविध क्षेत्रात कार्य सुरु आहे. अनेक गरजू घटकातील विद्यार्थ्यांना आधार देण्याचे कार्य ते सातत्याने करत असतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी व राष्ट्रीय सणानिमित्त निबंध, चित्रकला, वक्तृत्व व पोस्टर स्पर्धेचे आयोजन करतात. विद्यार्थ्यांसाठी विविध मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजनही करण्यात येते. गावात त्यांनी मोठ्या संख्येने वृक्षरोपण करुन त्याचे संवर्धन केले आहे. तसेच गावातील धार्मिक कार्यक्रमाला सामाजिक उपक्रमाची जोड देऊन विविध उपक्रम राबवित असतात. या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.