जिल्हा उपनिबंधकाच्या नावाने लाच घेणार्या महेश महांडुळेवर पुन्हा एक गुन्हा
अहमदनगर (प्रतिनिधी)- शेत जमीनीतील भाऊकीच्या वादातून घरात एकटी असलेल्या विवाहित महिलेस शिवीगाळ, मारहाण, विनयभंग केल्याप्रकरणी महेश गोविंद महांडुळे, बापूराव दगडू भोस व कांचन भानुदास महांडुळे (रा. रुईखेल, ता. श्रीगोंदा) यांच्या विरोधात गुरुवारी (दि.25 मे) श्रीगोंदा पोलीस स्टेशनला पिडीत महिलेच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील आरोपी महेश महांडुळे याने नुकतेच जिल्हा उपनिबंधकाच्या नावाने साडेतीन लाखाची लाच घेतल्याप्रकरणी लाचलूचपत विभागाने रंगेहाथ पकडले होते. यामध्ये जामीनावर सुटून आलेल्या सदर आरोपीने हा प्रकार केला आहे.
महांडुळे परिवारात शेत जमीन वाटपावरुन भाऊकीचे वाद सुरु आहे. आमच्या वाट्याला आलेल्या जागेत कांद्याची वखार बांधू नये, यासाठी फिर्यादी महिला व त्याचे पती 21 मे रोजी दिर भानुदास महांडुळे व जाव कांचन भानुदास महांडुळे यांच्याकडे गेले होते. मात्र त्यांनी फिर्यादी महिलेला व त्याच्या पतीला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. प्रकरण जास्त वाढू नये म्हणून ते तेथून निघून गेले. पती व मुले गावात जातो म्हणून सांगून गेले होते. बुधवारी (25 मे) रोजी सकाळी रुईखेल (ता. श्रीगोंदा) येथे घरात एकटी असलेल्या महिलेच्या घरात घुसून महेश महांडुळे, बापूराव भोस व कांचन महांडुळे यांनी पती व मुलांची विचारपूस करुन दमदाटी व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. महेश महांडुळे व बापूराव भोस याने साडी व ब्लाऊज ओढून विनयभंग केल्याचे फिर्यादीत महिलेने म्हंटले आहे. महिलेच्या फिर्यादीवरुन सदर आरोपींवर भा.द.वि. 323, 354, 452, 504, 506 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.