शिक्षण क्षेत्रातील रणांगणात कर्तृत्व सिध्द करुन बिकट परिस्थितीवर मात करता येणार -बाबासाहेब बोडखे
अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोनाच्या संकटकाळात मृत्यू झालेल्या शिक्षक मित्राचा प्रथम पुण्यस्मरणदिनी त्यांच्या शिक्षक मित्राने गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत दिली. शहरातील यतिमखाना येथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले स्व. प्रा .चंद्रकांत चौगुले यांचा मागील वर्षी निधन झाले. प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या ढवळपुरी (ता. पारनेर) गावात जाऊन त्यांचे शिक्षक मित्र असलेले शिक्षक परिषदेचे नेते व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी वाडी-वस्तीवरील गरजू विद्यार्थ्यांना स्वखर्चाने शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी डॉ. गणेश सांगळे, परिषदेचे कार्याध्यक्ष बबन शिंदे, बबन शेख, फाटके, धीरज चौगुले, दुर्गा चौगुले आदींसह चौगुले परिवारातील सदस्य उपस्थित होते.
बाबासाहेब बोडखे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रातील रणांगणात आपले कर्तृत्व सिध्द करुन बिकट परिस्थितीवर मात करता येणार आहे. शैक्षणिक साहित्या अभावी विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होता कामा नये, तसे झाल्यास आजच्या स्पर्धेत विद्यार्थी टिकू शकत नाही. कोरोनात अनेकांचा रोजगार हिरावला गेल्याने अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा वेळेत पुर्ण पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. ही जाणीव लक्षात घेवून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम सातत्याने सुरु आहे. शिक्षक मित्र स्व. प्रा .चंद्रकांत चौगुले यांनी नेहमीच गरजू घटकातील विद्यार्थ्यांना आधार देण्याचे काम केले. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणदिनी हा सामाजिक उपक्रम राबवून त्यांना खर्या अर्थाने श्रध्दांजली वाहण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.