ऑर्किड प्री स्कूलचा महिला दिनाचा आगळा-वेगळा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनामुळे दोन वर्षानंतर सुरु झालेल्या शाळा व पालकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महिला दिनाच्या कार्यक्रमात महिला पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. गृहिणी महिलांनी मैदानावर उतरुन विविध स्पर्धेत सहभाग नोंदवून खेळांचा मनमुरादपणे आनंद लुटला. अलमगीर, नागरदेवळे (ता. नगर) येथील स्पर्श सेवाभावी संस्था संचलित ऑर्किड प्री स्कूलच्या वतीने महिलांसाठी या आगळ्या-वेगळ्या पध्दतीने महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महिला दिनाच्या या कार्यक्रमाचे उद्घाटन अॅड. शितल सतिष बेद्रे व डॉ. गौरी विजय गणबोटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी संचालिका शितल प्रविण साळवे, शिक्षिका शिरीन अग्रवाल, अमरिन सय्यद, सुशिला आहिरे उपस्थित होत्या.
महिलांसाठी सांगित खुर्ची, डोक्यावर पुस्तक ठेऊन धावणे, लिंबू चमचा यांसारखे मनोरंजनात्मक मैदानी खेळ घेण्यात आले. या मैदानी खेळातून महिला आपल्या बालपणीच्या शालेय जीवनात रममाण झाल्या होत्या. सांगित खुर्चीत प्रथम- तृप्ती पारधे, द्वितीय- अस्मिता भबुते, डोक्यावर पुस्तक ठेऊन धावणे स्पर्धेत प्रथम- नीलम डांगिया, द्वितीय- मेहक सय्यद, लिंबू चमचा स्पर्धेत प्रथम- अनिसा शेख, द्वितीय- रुबीना असिफ यांनी बक्षिसे पटकाविली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या महिलांना बक्षीसे देण्यात आली.
अॅड. शितल सतिष बेद्रे यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी असलेले कायदे तर डॉ. गौरी विजय गणबोटे यांनी निरोगी व सदृढ आरोग्यासाठी सकस आहार व व्यायामबद्दल माहिती दिली.