शहरात सामाजिक कार्य करणार्या महिलांनी एकत्र येऊन स्थापन केले क्लब
लिनेस क्लबचे सामाजिक कार्य परिवर्तनाची नांदी ठरणार -वर्षा झंवर
अहमदनगर (प्रतिनिधी)- कौटुंबिक जबाबदार्या सांभाळून महिला सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत. महिलांनी हातात घेतलेले कार्य सिध्दीस जात असते. लीनेस क्लब कार्याने सामाजिक चळवळीला बळ मिळणार असून, हे सामाजिक कार्य परिवर्तनाची नांदी ठरणार असल्याचे प्रतिपादन लिनेसच्या मल्टीपल प्रेसिडेंट वर्षा झंवर यांनी केले.
शहरात सामाजिक कार्य करणार्या महिलांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या लिनेस क्लब मिडटाऊन अहमदनगर च्या पदग्रहण सोहळ्यात झंवर बोलत होत्या. प्रारंभी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पाहुण्यांचे स्वागत जनसंपर्क अधिकारी माधवी मांढरे व कल्पना ठुबे यांनी केले. लिनेस क्लबचे नूतन अध्यक्षा संपूर्णा सावंत, सचिव स्वाती जाधव, खजिनदार सविता नवथर, उपाध्यक्षा कल्पना ठुबे यांना शपथ देऊन पदाची सूत्रे देण्यात आली.
डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट रजनी गोंदकर यांनी लिनेस क्लबच्या सामाजिक कार्याची ध्येय धोरणे सांगून, नुतन पदाधिकार्यांना आपल्या जबाबदार्यांची जाणीव करुन दिली. माजी डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट छाया राजपूत यांनी नूतन पदाधिकार्यांना शुभेच्छा दिल्या.
नूतन अध्यक्षा संपूर्णा सावंत म्हणाल्या की, लिनेस ही आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्य करणारी सेवाभावी संस्था आहे. अनेक महिला या क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असून, शहरात लिनेसच्या माध्यमातूनही समाजातील दुर्बल घटकांना प्रवाहात आनण्यासाठी कार्य केले जाणार आहे. या वर्षीच्या कार्यकाळात भरीव सामाजिक कार्य करण्याचा व महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. सुनंदा तांबे यांनी केले. आभार स्वाती जाधव यांनी मानले.