कै. राजश्री मांढरे यांच्या स्मरणार्थ सामाजिक उपक्रम
सामाजिक चळवळीत महिलांचे योगदान बदलाच्या दिशेने क्रांतिकारक -डॉ. श्रीकांत पाठक
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक चळवळीत महिलांचे योगदान बदलाच्या दिशेने क्रांतिकारक ठरत आहे. कै. राजश्री मांढरे यांनी सामाजिक कार्यात योगदान देऊन एक आदर्श निर्माण केला. त्यांचे कार्य महिलांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हा चिकित्सक डॉ. श्रीकांत पाठक यांनी केले.
लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनच्या वतीने कै. राजश्री मांढरे यांच्या स्मरणार्थ जिल्हा रुग्णालयामधील महिला वार्ड व बाल रुग्णालय विभागात फळ वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. पाठक बोलत होते.

याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज घुगे, लायन्स मिडटाऊनच्या अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, सचिव प्रसाद मांढरे, क्लबचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मांढरे, डॉ. विक्रम पानसंबळ, नितीन देशमुख, सुरेंद्र मुथा, अनिल इंगळे, प्राचार्य शोभा भालसिंग, नगरसेविका वीणा बोज्जा माधवी मांढरे, लतिका पवार, संपूर्णा सावंत, अनिल इवळे आदींसह लायन्सचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे डॉ. पाठक म्हणाले की, कै. मांढरे या जिल्हा शासकीय रुग्णालयात संचालक सल्लागार समितीवर 17 वर्षे सातत्याने कार्यरत होत्या. त्यांनी जिल्हा रुग्णालयातील गरजू रुग्णांसाठी देखील विविध उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी प्रास्ताविकात लायन्स मिडटाऊनच्या मागील तीस वर्षापासून सुरु असलेल्या सामाजिक कार्याची माहिती देऊन स्व. मांढरे यांनी क्लबमध्ये दिलेल्या योगदानाची माहिती दिली. श्रीकांत मांढरे म्हणाले की, विविध क्षेत्रातील महिलांना कै. राजश्री मांढरे यांनी लायन्सच्या माध्यमातून संघटित करुन सामाजिक कार्य पुढे चालवले. अनेक गरजवंतांना भरीव मदत मिळवून दिली. तर दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी उपक्रम राबविले. त्यांचे स्मरण करुन ही सामाजिक चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी मांढरे परिवार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. सचिव प्रसाद मांढरे यांनी आभार मानले.