नेत्र तपासणी शिबीरास ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
रोटरी इंटेग्रिटीच्या स्थापना दिनाचा सामाजिक उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक योगदान देणार्या रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटेग्रिटीचा स्थापना दिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा होत आहे. रोटरी इंटेग्रिटीच्या तिसर्या वर्धापन दिनानिमित्त सुरु असलेल्या सामाजिक उपक्रमातंर्गत गोगलगाव (ता. नेवासा) येथील ग्रामस्थांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. रोटरी इंटेग्रिटी व प्रकाश नेत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या शिबीरास ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
रोटरी इंटेग्रिटीचे अध्यक्ष सुयोग झंवर म्हणाले की, कोरोनाने सर्वांचे आर्थिक नियोजन विस्कटले आहे. खर्चिक आरोग्य सुविधा अवाक्याबाहेर गेले असून, मोफत शिबीरामुळे सर्वसामान्यांना आधार मिळत आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत घेऊन जाण्याचे कार्य रोटरी इंटेग्रिटी करीत आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये वयोमानानुसार नेत्रदोष निर्माण होत असताना गावात घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबीराने अनेकांना नवदृष्टी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोगलगाव येथे झालेल्या नेत्र तपासणी शिबीरात डॉ. राजीव चिटगोपिकर यांनी अत्याधुनिक मशीनद्वारे ग्रामस्थांची नेत्र तपासणी केली. पंचक्रोशीतील गावकर्यांनी या शिबीराचा लाभ घेतला. उत्तमपणे सेवा दिल्याबद्दल गोगलगावचे सरपंच शिल्पाताई मते व दिलीप मते यांनी रोटरीचे आभार मानले.