मागासवर्गीय समाजातील मुख्याध्यापकाला सहा वर्षापासून पेन्शन, ग्रॅज्युइटीपासून वंचित ठेवल्याचा आरोप
पिडीत मुख्यध्यापकास त्वरीत थकीत देयके देण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- मागासवर्गीय समाजातील मुख्याध्यापकाला पेन्शन, ग्रॅज्युइटी व इतर थकीत देयके देण्याबाबतचा निकाल होऊनही दिली जात नसल्याने या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणार्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने काळे फासण्याचा इशारा देण्यात आला आहे. पिडीत मुख्याध्यापकाला त्वरीत न्याय मिळण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे नायब तहसीलदार राजेंद्र दिवाण यांना देण्यात आले. यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, नगरसेवक राहुल कांबळे आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
दिलीप पुंजा कसबे हे कै.लालाशेठ बिहाणी विद्या मंदिर प्रशाला राहुरी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. संस्थेने त्यांना बडतर्फ केल्यावर, त्यांनी संस्थेच्या विरोधात शाळा न्यायधीकरण सोलापूर येथे अपील केले होते. अपिलात कसबे यांच्या बाजूने निकाल लागला. त्यानंतर संस्थेने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. सदर याचिकेचा निकाल 2 डिसेंबर 2021 रोजी झाला. खंडपीठाने संस्थेचा दावा फेटाळून लावला. या निकालानुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी दिलीप कसबे यांना पेन्शन, ग्रॅज्युइटी व इतर थकीत देयके देण्यास बंधनकारक होते. याबाबत कसबे यांनी शिक्षणाधिकारी यांच्याशी पाठपुरावा करुन देखील त्याची पुर्तता झाली नाही. त्यानंतर शिक्षण उपसंचालक पुणे यांना विनंती अर्ज केल्यानंतर त्यांनी संबंधित प्रकरणी तातडीने कार्यवाही बाबत शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना सुचित केले होते. तरी देखील माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
शिक्षणाधिकारी यांनी सदर संस्थाप्रमुखांशी संगणमत करून मागासवर्गीय असणार्या कसबे यांची व त्यांच्या कुटुंबाची आर्थिक आणि मानसिक पिळवणुक करुन त्यांना सहा वर्षापासून पेन्शन, ग्रॅज्युइटीपासून वंचित ठेवण्यात आले असल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आला आहे. कसबे यांना हक्काची पेन्शन, ग्रॅज्युइटी व इतर थकीत देयके मिळण्यासाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी त्वरीत कार्यवाही करावी. अन्यथा येत्या पंधरा दिवसात काळे फासण्याचा इशारा रिपाईच्या वतीने देण्यात आला आहे.