इंडिया अगेन्स्ट तमस् स्लेव्हरी, भारतीय जनसंसद आणि पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार
लोकर्कासूर आणि न्याय कर्कासूर बिमोड करुन मतदारांमध्ये उन्नत चेतना जागरुक करण्याचा प्रयत्न
अहमदनगर (प्रतिनिधी)- इंडिया अगेन्स्ट तमस् स्लेव्हरी, भारतीय जनसंसद आणि पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने शिवजयंती दिनी रविवारी (19 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता मुळाडॅमवर छत्रपती शिवाजी महाराजांना पंचवंदना देण्यात येणार आहे. यामध्ये महाराजांना भारतीय संविधान, हिमालय, गंगा, गीताभारत आणि उन्नत लोकशाही या पंचसूत्रीची मानवंदनेने अभिवादन केले जाणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी गीताभारतातील उन्नत चेतना आणि तुफानी उर्जा संपादीत करुन स्वराज्य उभारणी केली. गीताभारतातील भगवान श्रीकृष्ण यांची उन्नत चेतना आणि अर्जुनाची तुफानी उर्जा या संगमाने कौरवांचा बिमोड झाला. आज भारतात लोकर्कासूर आणि न्याय कर्कासूर यांनी सामान्य माणसाला वेठीस धरले आहे. त्यामुळेच भारतातील संसदीय लोकशाही अडचणीत आली आहे. यासाठी भारतीय संविधानाला गीताभारताचे क्रायोजनिक इंजिन जोडून देशातील प्रत्येक मतदारांमध्ये उन्नत चेतना आणि तुफानी उर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे सार्वजनिक जीवनातील लोक कर्कासूर आणि न्याय कर्कासूर यांचा बिमोड होणार असल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
निसर्गाच्या दोन भाषा मानसाला माहिती आहेत. त्यापैकी ध्यानविद्या भारतामध्ये गेली 5 हजार वर्षे विकसित झाली आहे. त्यातूनच गीताभारत निर्माण झाला. निसर्गाची दुसरी भाषा गणित, शास्त्र असून, त्यामुळे पाश्चात्य देशांमध्ये कॉन्टम् फिजिक्स विकसित झाले. त्यामुळे निसर्गाचे मुख्य सूत्र म्हणजे जीवनाला उपयुक्त असणार्या बाबींमध्ये सजीवांना आनंद असतो, तर जीवनाला मारक बाबींमध्ये यातना असतात. याच कारणासाठी संसदीय लोकशाहीमध्ये मागच्या दाराने सत्ता मिळविणार्या लोक कर्कासूरांना कायमचे दूर करण्यासाठी प्रत्येक मतदाराला आपल्या ठिकाणी असणारी ढब्बू मकातेगिरी दूर करून जय शिवाजी, जय डिच्चू कावा या महामंत्राचा स्विकार करावा लागणार असल्याचे अॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.
या शिवजयंतीला जय गीताभारत, जय डिच्चूकावा, जय शिवाजी, जय डिच्चूकावा अशी मोहिम या संघटनांच्या वतीने राबविण्यात येणार आहे. गीताभारत स्वातंत्र्योत्तर काळात सातत्याने दूर ठेवल्यामुळे आणि त्याची पोथी केल्यामुळे या देशात भ्रष्टाचार, अनागोंदी आणि टोलवाटोलवी वाढली आहे. देशात चंगळवाद वाढला, परंतु नैतिक मुल्यांचा र्हास झाला. मी, माझे, मलाच या तमस् चेतनेचा प्रभाव दिल्लीपासून गल्लीपर्यंत सार्वजनिक जीवनात दिसून येत आहे. त्यामुळे लोकर्कासूर कोटयावधी रुपयांच्या जनतेच्या पैशावर डल्ला मारत आहे. तर मतदार हजार-पाचशे रुपये कोंबडी, दारु अशा तमस् लोभाला बळी पडत असल्याचा आरोप संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे. स्वातंत्र्याची फळे सर्वसामान्यांना मिळण्यासाठी भारतीय संविधानाला गीताभारताचे क्रायोजनिक इंजिन पूर्णपणे उपयुक्त ठरणार असल्याचे म्हंटले आहे. यासाठी अॅड. गवळी, अशोक सब्बन, सखाराम सरक, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, डॉ. मेहबुब सय्यद, अर्शद शेख, कैलास पठारे, यमनाजी म्हस्के, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.
