निरोगी आरोग्यासाठी वर्षभर व्यायाम व योग करण्याचे आवाहन
तर पर्यावरणाच्या आरोग्यासाठी वृक्षरोपण
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील भगवान गौतमबुध्द जॉगींग पार्कमध्ये हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास ग्रुपच्या सदस्यांसह नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग लाभला.

निरोगी आरोग्यासाठी नागरिकांना वर्षभर व्यायाम व योग करण्याचे आवाहन करुन पर्यावरणाच्या आरोग्यासाठी वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
योगप्रशिक्षक प्रकाश देवळालीकर, हेमंत गोयल, विनोद मुथा व संगिता रायकवाड यांनी विविध आसने प्रात्यक्षिकासह सादर केले. उपस्थित ग्रुपचे सदस्य व नागरिकांनी विविध आसने करुन वर्षभर व्यायाम व योग करण्याचा निर्धार व्यक्त केला. भिंगार कॅन्टोमेंट बोर्डाचे उपाध्यक्ष वसंत राठोड यांनी देखील योग कार्यक्रमात सहभाग नोंदवून विविध आसने केली. या योग सोहळ्यात महिलांची देखील उपस्थिती होती.

हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ म्हणाले की, अनेक वर्षापासून हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून आरोग्य चळवळ चालविण्यात येत आहे. ग्रुपचे चारशेपेक्षा जास्त सदस्य असून, ते दररोज सकाळी भिंगारच्या जॉगींग पार्कमध्ये एकत्र येऊन योगा करत असतात. निरोगी आरोग्यासाठी नागरिकांना वर्षभर व्यायाम व योग करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्याबाबत जागृक राहून ग्रुपचे सदस्य पर्यावरण संवर्धनासाठी सक्रीय योगदान देत असून, प्रत्येक सदस्याचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा केला जातो. तर ग्रुपच्या वतीने शहरातील ऐतिहासिक ठिकाणी झाडे लावून त्याचे संवर्धनाचे कार्य सुरु असल्याची त्यांनी माहिती दिली. योगने निरोगी राहून व पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावून देशाची सेवा घडविण्याचे त्यांनी आवाहन केले.
