साउथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगारच्या सौरवनगर येथील कुणाल परदेशी या युवकास साउथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या वतीने सामाजिक कार्याबद्दल मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. नुकतेच चेन्नई येथे झालेल्या ग्लोबल अचिव्हर्स कौन्सिल इंटरनॅशनल कॉन्वोकेशन अवार्ड 2022 सोहळ्यात परदेशी यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
कुणाल परदेशी बुर्हाणनगर येथील बाणेश्वर महाविद्यालयात बीसीएस पदवीसाठी शिक्षण घेत आहे. भारतीय लष्करातील सेवानिवृत्त जे.सी. ऑफिसर सुनील महादू परदेशी यांचे ते चिरंजीव असून, तो उत्कृष्ट व्याख्याता आहे. आपल्या प्रेरणादायी भाषणातून तो युवकांना घडविण्याचे कार्य करत आहे. तो प्रसिध्द युट्यूबर असून, त्यांचे प्रेरणादायी व्याख्याने देशभरात पाहिले जातात. युवकांचा व्यक्तिमत्व विकास व उद्योजक होण्यासाठी तो नेहमीच मार्गदर्शन करत असतो. कोरोना काळात लहान विद्यार्थी मोबाईलमध्ये अडकले असून, त्यांना मोबाईलमुक्त जीवन जगण्यासाठी व मैदानी खेळाकडे वळविण्यासाठी तो सामाजिक चळवळ चालवत आहे. सुसंस्कारी पिढी घडविण्यासाठी भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्याचे कार्य देखील सुरु आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन परदेशी याला मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.