प्रभातफेरीतून विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश
पर्यावरण संवर्धन व सार्वजनिक स्वच्छतेत योगदान ही एक देशसेवाच -रामदास फुले
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशातील महात्मे व महापुरुषांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले.
संत सावता महाराज मंदिराच्या प्रांगणात समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. झेंड्याभोवती आकर्षक रांगोळी व फुलांची सजावट करण्यात आली होती. नेप्ती विद्यालय व जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त काढलेल्या प्रभातफेरीद्वारे स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. भारत मातेच्या जयघोषाने गावाचा परिसर दणाणून निघाला होता.
रामदास फुले म्हणाले की, एका विचाराने, एका ध्येयाने प्रेरित होवून स्वातंत्र्य लढा यशस्वी झाला. देशाला स्वातंत्र्य अनेकांच्या बलिदान व त्यागातून मिळाले आहे. देशाच्या विकासासाठी सर्वांनी प्रेरित होवून योगदान देण्याची गरज आहे. पर्यावरण संवर्धन व सार्वजनिक स्वच्छतेत योगदान ही एक देशसेवाच असून, यामध्ये सहभागी होण्याचे त्यांनी सांगितले.
गावात झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी सरपंच सुधाकर कदम, समता परिषदेचे भानुदास फुले, शाखा अध्यक्ष शाहूराज होले, शिवसेना उपतालुकाप्रमुख जालिंदर शिंदे, माजी सरपंच अंबादास पुंड, पोलीस पाटील अरुण होले, सुभाष नेमाने, अशोक गवळी, विश्वनाथ होले, संतोष बेल्हेकर, पाराजी चौरे, राजेंद्र झावरे, नानासाहेब घोडके, बाबासाहेब भोर, राजू सांगळे, श्रद्धा भांड, सुनीता प्रभाणे, अश्विनी पवार आदींसह शालेय शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी व समता सैनिक मोठ्या संख्येने
उपस्थित होते.