संख्यात्मक निकालापेक्षा गुणात्मक निकालाकडे लक्ष द्यावे -प्रा. रंगनाथ सुंबे
अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पालक मोठे कष्ट घेत असून, शहरी चंगळवादात न गुंतता आपले ध्येय साध्य करावे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी गुणवत्ता महत्त्वाची आहे. स्पर्धा परीक्षेसाठी इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्न विचारलेले असतात. यासाठी प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण भविष्याचा पाया असून, संख्यात्मक निकालापेक्षा गुणात्मक निकालाकडे लक्ष देण्याचे आवाहन प्रा. रंगनाथ सुंबे यांनी केले.
निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाच्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात प्रा. सुंबे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष साहेबराव बोडखे, सचिव भागचंद जाधव, विद्यालयाचे मुख्याध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, डॉ. विजय जाधव, उद्योजक कोंडीभाऊ फलके, गोरख चौरे, काशीनाथ पळसकर, निळकंठ वाघमारे, दत्तात्रय जाधव, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, प्रशांत जाधव, उत्तम कांडेकर, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, भाऊसाहेब ठाणगे, संदिप डोंगरे, तुकाराम खळदकर आदींसह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष साहेबराव बोडखे यांनी शाळेच्या वाढत्या गुणवत्तेचा आलेख दर्शवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविण्यात येणार्या उपक्रमाची माहिती दिली. पै. नाना डोंगरे यांनी स्पर्धामय जीवनात दहावी व बारावीला अधिक महत्त्व असून, हे जीवनाचे टर्निंग पाँइट आहे. विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच ध्येय निश्चित करुन त्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे. ध्येय नसलेला विद्यार्थी जीवनात यशस्वी होवू शकत नाही. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी डोंगरे संस्थेच्या माध्यमातून देखील विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना बोर्डाचा पेपर कसा लिहावा? व जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
महिला दिनाचे औचित्यसाधून गावातील शासनाचा आदर्श युवती पुरस्कार प्राप्त व राष्ट्रीय खेळाडू प्रियंका डोंगरे-ठाणगे हिचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन काशीनाथ पळसकर यांनी केले. आभार उत्तम कांडेकर यांनी मानले.