चौदा वर्षापासून महापालिकेच्या जागेत लावलेली हातगाडी हॉस्पिटल समोरुन हटविली
त्या हॉस्पिटल समोर मुलंबाळांसह उपोषण करण्याचा महिलेचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- तारकपूर बस स्टॅण्ड समोरील एका मोठ्या हॉस्पिटलच्या डॉक्टराने पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम पुढे करुन महापालिकेच्या जागेत चौदा वर्षापासून चहा व नाष्ट्याची हातगाडी लावणार्या महिलेस हटविल्याने महिलेच्या कुटुंबीयांवर उपासमारीची कुर्हाड कोसळली आहे. महिलेच्या मुला-बाळांचे शिक्षणासह उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला असून, पुन्हा हातगाडी लावून न दिल्यास व्हिक्टोरिया फ्रान्सिस जॉर्ज या महिलेने त्या हॉस्पिटल समोर मुलंबाळांसह उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

व्हिक्टोरिया फ्रान्सिस जॉर्ज ही महिला मागील चौदा वर्षापासून तारकपूर समोरील एका मोठ्या खासगी हॉस्पिटल समोर महापालिकेच्या जागेत चहा व नाष्टा सेंटरची गाडी लावून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवते. कर रुपाने ती महापालिकेची पावती देखील फाडत आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखिची असून, त्यांचा उदरनिर्वाह त्या हातगाडीवर विसंबून आहे. खासगी हॉस्पिटलच्या त्या डॉक्टरने गोड बोलून पेव्हिंग ब्लॉकचे काम झाल्यानंतर पुन्हा हातगाडी लावण्याचे सांगितल्याने सदर महिलेने आपली हातगाडी हटवली. मात्र काम पूर्ण करुन हातगाडी लावण्यात येणार नाही, अशा पध्दतीने पेव्हिंग ब्लॉक लावून कंम्पाऊंड टाकण्यात आले आहे. डॉक्टरांना अनेकवेळा विनंती करुन देखील ते हातगाडी लावण्यास विरोध करीत आहे. त्या ठिकाणी बाऊन्सर उभे करण्यात आले असून, सदर महिला तेथे गेल्यास तिला दमदाटी करुन हाकलून लावण्यात येत असल्याचा आरोप महिलेने केला आहे.
तब्बल दहा महिन्यापासून हातगाडी लावू न दिल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून, सदर महिलेने गाडी पुन्हा लावण्यास सहकार्य करण्याच्या मागणीचे निवेदन महापालिका प्रशासन व जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे.