अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे महापालिका प्रशासनाला निवेदन
हॉस्पिटलने रस्त्यावर सार्वजनिक जागेत लोखंडी रॉड व पेव्हिंग ब्लॉक टाकून अतिक्रमण केल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर बस स्थानक समोरील खासगी हॉस्पिटलने रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढण्याची तत्परता अतिक्रमण विभागाने दाखवण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना दिले.
तारकपूर बस स्थानक समोर एका खासगी हॉस्पिटलच्या वतीने रस्त्यावर सार्वजनिक जागेत लोखंडी रॉड व पेव्हिंग ब्लॉक टाकून अतिक्रमण केले आहे. सदरील अतिक्रमण विरोधात अनेक संघटनांनी तक्रार करुन देखील महापालिका प्रशासनाला जाग आलेली नाही. या हॉस्पिटलचे ऑक्सिजन प्लांट देखील रस्त्यालगतच उभे करण्यात आले आहे. त्यामुळे काही धोका उद्भवल्यास मोठ्या प्रमाणावर जीवित हानी होऊ शकते. काही दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.
तारकपूर बस स्थानक समोरील खासगी हॉस्पिटलने रस्त्यावर केलेले अतिक्रमण त्वरीत काढावे, ऑक्सिजन प्लांटची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा समितीच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.