• Wed. Feb 5th, 2025

जय हिंद फाउंडेशनने चिंतामणी महादेव मंदिर परिसरात लावली पन्नास वडाची झाडे

ByMirror

Aug 3, 2022

देश सेवेच्या भावनेने माजी सैनिकांचे वृक्षरोपण व संवर्धन अभियानात योगदान -शिवाजी पालवे

अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांच्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने रावळगाव (ता. कर्जत) येथील चिंतामणी महादेव मंदिर परिसरात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. जय हिंद फाऊंडेशनने जिल्ह्यातील ऐतिहासिक, पर्यटन स्थळ, डोंगररांगा, उजाड माळरानं हिरवाईने फुलविण्यासाठी वृक्षांची लागवड करुन त्याच्या संवर्धनाचे कार्य हाती घेतले आहे. या उपक्रमांतर्गत चिंतामणी महादेव मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली.


या वृक्षरोपण अभियानाप्रसंगी एल अ‍ॅण्ड टीचे प्लांटचे मुख्य अधिकारी दिलीप आढाव, बीपीसीएल डेपोचे अधिकारी निरंजनसिंह यादव, अहमदनगर एमआयडीसी सुरक्षा व्यवस्थापक स्वप्निल देशमुख, ग्लोबल फाऊंडेशनचे गिरी कर्णिक, जगदीश शिंदे, अप्पा अनारसे, युवक क्रांती दलाचे अतुल मुळे, जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, जालिंदर दरेकर, नागर फाऊंडेशनचे रवींद्र गोरे, धनंजय मोकासे, तात्यासाहेब खेडकर, राजेंद्र खेडकर, महेंद्र महाराज खेडकर, ऋषिकेश अडागळे, दत्तात्रय खेडकर, प्रकाश खेडकर आदी उपस्थित होते.


दिलीप आढाव म्हणाले की, जिल्ह्याला निसर्गरम्य बनवून पर्यावरण संवर्धनासाठी जय हिंदच्या माध्यमातून माजी सैनिकांची उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. जिल्ह्यात अनेक निसर्गरम्य ठिकाण व डोंगररांगा असून, तेथे झाडांची कत्तल झाल्याने ते ओसाड झाले असून, निसर्गाला पुन्हा वैभव प्राप्त करुन देण्यासाठी हा उपक्रम दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवाजी पालवे यांनी निसर्ग बहरला तर सजीव सृष्टीचे प्रश्‍न सुटणार आहे. निसर्गाचा समतोल साधण्यासाठी वृक्षरोपणाची गरज आहे. देश सेवेच्या भावनेने माजी सैनिक या अभियानात योगदान देत असल्याचे त्यांनी सांगितले. रावळगाव नागर फाउंडेशनचे रवी गोरे यांनी लावण्यात आलेली सर्व झाडे जगवण्याची जबाबदारी नागर फाउंडेशनने स्विकारली असून, भविष्यात चिंतामणी महादेव मंदिर परिसर वटवृक्षांनी बहरणार आहे. हे निसर्गरम्य ठिकाण जिल्ह्याच्या नकाशावर येणार असल्याचे स्पष्ट केले. आभार शिवाजी गर्जे यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *