आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना योग, प्राणायामाचे धडे
विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी राबविण्यात आला उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आर्ट ऑफ लिविंगच्या कार्य शाळेत योग प्राणायामाचे धडे गिरवले. या तीन दिवसीय कार्यशाळेने संपूर्ण शाळेचे वातावरण योगमय बनले होते.

जे.एस.एस. गुरुकुल मधील इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी या कार्याशाळेत उत्सफुर्त सहभाग नोंदवला. स्पर्धामय युगात विद्यार्थ्यांचे जीवन तणावपूर्ण बनले आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी व जीवन उत्साहपूर्ण होण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत बेंगलोर येथील इंटरनॅशनल योग शिक्षक प्रशांत लालचंदणी यांनी विद्यार्थी व शिक्षकांना योग व प्राणायामाचे प्रात्यक्षिकासह धडे देऊन, योगाचे विविध प्रकार त्याचे होणारे फायदे सांगितले. प्राचार्य आनंद कटारिया म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शाळेची सुरुवात योग व प्राणायामाने सुरु केल्यास त्यांच्यात मोठा बदल होणार आहे. निरोगी आरोग्यासह प्रखर बुध्दीमत्तेला चालना मिळणार आहे.
आत्मिक व शारीरिक बळ योग-प्राणायामाने मिळते. प्रत्येकाच्या जीवनात धावपळ व तणाव असून, या परिस्थितीमध्ये जो योग्य निर्णय घेऊन कृती करतो, तो जीवनात यशस्वी होतो. लहान वयातच विद्यार्थ्यांना योग-प्राणायामची आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तीन दिवसीय कार्यशाळेत मनाला एकाग्र करून त्याच्या बरोबर श्वासोच्छावासची केली जाणारी सुदर्शन क्रिया शिकवली गेली. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ सांभाळून आनंदी कसे राहायचे? हे शिकवले गेले. या कार्यशाळेतून शालेय वातावरण योग व ध्यानमय बनले होते.

