नियमित मोफत योग वर्गाचा केडगांव जागरूक नागरिक मंचाचा स्तुत्य उपक्रम -योगाचार्य प्रकाश बिडकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव जागरूक नागरिक मंचच्या वतीने मंगळवारी (दि.21 जून) आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. केडगाव येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात नागरिकांना योगासनांचे विविध प्रकार व प्राणायामाची माहिती देण्यात आली. उपस्थितांनी योगाचे विविध आसने केली.
नागरिकांच्या सुदृढ शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी केडगांव जागरूक नागरिक मंचने प्रयत्न सुरू ठेवले असून, नियमित मोफत योग वर्ग घेतलेले जातात. याचा लाभ घेण्याचे आवाहन मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांनी केले. एक दिवसापुरता योग दिवस साजरा न करता निरोगी आरोग्यासाठी वर्षभर राबविण्यात येणारा नियमित योग वर्गाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे योगाचार्य प्रकाश बिडकर यांनी सांगितले.
अविनाश गायकवाड यांनी शाहूनगर, माधवनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे दररोज सकाळी 5.15 ते 6.15 या वेळेत नियमित योगावर्ग घेतले जात असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेकांनी नियमित योगासने करण्याचा संकल्प केला. याप्रसंगी जालिंदर शिंदे, मीनाक्षी गायकवाड, वर्षा बळीद, ललिता दावभट, संगीता नेव्हे, जयश्री म्हस्के, राजेंद्र रासकर, मनिषा दावभट, ज्योती कोहोक, सुरेखा कोतकर, सुनिता कोतकर आदी उपस्थित होते.