दाद मागूनही न्याय मिळत नसल्याची तक्रार
चौकशीच्या नावाखाली दप्तर दिरंगाईने सत्य दडपविण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळण्यासाठी दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने कायदा हातात घेण्याचे खुले पत्र सामाजिक कार्यकर्ते अरुण खिची यांनी मुख्य सचिवांना ाणि जिल्हाधिकारी यांना पाठविले आहे. सत्याला न्याय मिळण्यासाठी कायदेविषयी प्रामाणिक व इमानदार अधिकारींची नेमणुक व्हावी किंवा सत्याला न्याय देण्यासाठी कायदा हातात घेण्याची परवानगी मिळण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कोणावरही अन्याय होऊ नये, म्हणून सत्याचा मार्ग धरला. होणारा अन्याय सहन न करता त्या विरोधात आवाज उठवला, तक्रारी केल्या. कायद्याचा गैरवापर केला नाही. परंतु बेकायदेशीर वागणार्यांना संरक्षण मिळत असल्याची खंत व्यक्त करुन कायद्याप्रमाणे न्याय मिळण्याची अपेक्षा खिची यांनी व्यक्त केली.
कायदे व नियमांचे पालन केल्यानंतर कधी चौकशीच्या तर कधी पाठपुराव्याच्या नावाखाली दप्तर दिरंगाई करुन प्रकरणे प्रलंबित ठेऊन सत्य दडपविण्याचे प्रकार घडत आहेत. कायद्यालाच नाकारुन न्याय देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सत्याच्या मार्गाने न्याय देता येत नसेल तर इच्छा मरणाची परवानगी दोनवेळा मागितली, कायद्याची माहिती देऊन शिक्षा द्या अशी ही मागणी केली. वारंवार होणारी सत्याची विटंबना व हेटाळणी पाहून ब्रिदवाक्यात बदल करण्याची मागणी केली. मात्र शेवट पर्यंत याचे उत्तर देण्यात आलेले नसल्याचे पत्रात म्हंटले आहे.
कायदे व नियमांस न्याय मिळत नसेल तर कायद्याचे पालन का करावे?, कायद्यालाच न्याय दिला जात नाही तर मग हे राज्य कोणाचे आणी कायद्याला अनुसरुन शिक्षा देण्याचा अधिकार कोणाला? हा प्रश्न खिची यांनी उपस्थित केला आहे.