• Fri. Sep 19th, 2025

कर्मवीरांच्या विचारांचा कर्मनिष्ठ पाईक

ByMirror

May 30, 2023

अशी एकच अधिकारी व्यक्ती अनुभवली जी दररोज कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करते

सकाळी कार्यालयात आले की प्रथम सरळ कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेसमोर हात जोडायचे नतमस्तक व्हायचे व असेल तर एक फूल किंवा अगरबत्ती कर्मवीरांच्या प्रतिमेवर अर्पण करायची आणि आसनाला स्पर्श करून प्रसन्नमनाने कामाला सुरुवात करायची, पण यात फक्त श्रद्धा! कर्मकांड अजिबात नाही. हा नेम अव्याहतपणे आजही तसाच चालू आहे. एवढी अढळ श्रद्धा कर्मवीरांवर आहे. अतिशय मनोभावे दर्शन घेणारी ही कर्मवीर भक्ती!


यापेक्षा कुठे नतमस्तक व्हावे, अशी योग्य जागाच जणू नाही ! असा भक्तिभाव ज्यांनी आयुष्यभर जपला ते एकच व्यक्तिमत्त्व! कन्हेरकर तुकाराम पांडुरंग ! मुख्याध्यापक, शिक्षण एम.ए.बी.एड. मु. पो. भानगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर सेवावृत्ती होताना मला जे वाटले ते सत्यकथन करीत आहे, भलेही ते इतरांना आणखी वेगळे वाटतील.


19 जून 1991 रोजी त्यांची शिक्षक म्हणून नेमणूक झाली. विनाअनुदानित हा स्वयंसिद्ध शैक्षणिक संसार चालवणे म्हणजे तुटपुंजे वेतन सुखसोयी नाहीत, आर्थिक विवंचना भौतिक सुविधांचा अभाव खरे तर हे विनाअनुदानित विना वेतन एखादी शाखा चालवणे म्हणजे एक दिव्यच होते. पण त्यातील आनंद आणि अनुभव हा वेगळाच होता. अनेक प्रश्‍न अनेक समस्या अनेक अडचणी समोर आ वासून उभ्या असताना न डगमगता कंबर कसली व मनोमन निश्‍चय केला आणि आजी माजी विद्यार्थी व लोकसहभागातून कामाची नाळ जुळत गेली. यासाठी माणसेपण जोडली गेली. मोठी मानवी साखळी त्यांनी सेवा काळात जोडली हे वैशिष्टय! आणि यश मिळत गेले.


कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शून्यातून रयतेचं विश्‍व निर्माण केलं बहुजनांच्या मुलांसाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं तिथं संकटांना कुरवाळत बसण्यापेक्षा त्यावर मात करून पुढे गेलं पाहिजे! हा दृढनिश्‍चय उराशी बाळगून आज शेवटास आणला. चांडगाव नंतर कोतूळ तसेच घोगरगाव, बेलवंडी या शाखा बदलीने मिळाल्या. बदली हा रयत सेवकाचा स्थायीभाव समजून पुन्हा अहमदनगर शहरातील कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय येथे मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. तेथेही गुणवत्तेचा अंक वाढवला आणि विद्यार्थी संख्या ही वाढवली. एवढेच नव्हे तर अहमदनगर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेली ही शाळा अतिशय उपेक्षित शाळा म्हणून समजली जात असे. नोकरीच्या दृष्टीने सर्वांना सोयीची पण शैक्षणिक घसरण झालेली, वर्षानुवर्षे जागेच्या वादात सापडलेली नगर शहरातील हे विद्यालय! धनदांडग्यांच्या तावडीत सापडलेली शाखा स्वतः समर्थपणे उभे राहून अगदी मोठे आव्हान स्वीकारून त्यांनी वॉल कंपाऊडची बांधबंधिस्ती केली आणि शाळेच्या सीमा निश्‍चित करून घेतल्या हे करत असताना अतिशय दुर्धर प्रसंगाला त्यांना आणि स्टाफला सामोरे जावे लागले. परंतु रयत शिक्षण संस्थेच्या मालकीची शाळा व रयतेची मालमत्ता मुख्याध्यापक या नात्याने त्यांनी काही सधिसाधूंच्या तोंडातून संस्था पदाधिकार्‍यांच्या खंबीर पाठिंब्याने सहिसलामत बाहेर काढली. हे धाडस फक्त सरच करू शकले. अगदी अंगावर धावून आलेल्यांना माघार घ्यावी लागली. तसे हे सोपे काम नव्हतेच पण जिद्द चिकाटी संयम व रयतेच्या निष्ठेपायी त्यांनी शक्य करून दाखवले.
या शाळेचाही एक आगळावेगळा इतिहास आहे कर्मवीर शंकरराव काळे साहेब यांनी केवळ लक्ष्मीबाई या नावामध्ये माझे सर्वस्व सामावले, मातृप्रेम दडलेले आहे. कर्मवीर व रयत माउलीच्या आंतरिक भक्तिभावनेतून शाळेसाठी काळेसाहेबांनी आपले तन मन धन समर्पित केले व ती शाळा वाचावी यासाठी त्यांनी कोर्ट दरबारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रात केलेली मदत व प्रयत्नांचे मोल कुणीच करू शकत नाही. हे समाधान निश्‍चितच मुख्याध्यापक म्हणून व सेवक म्हणून सर्वांना लाभले या समाधान व आनंदाची तुलना कशाशीही करता येणार नाही. याच शाळेत मला कन्हेरकर सराचा सहवास लाभला. त्यांच्या समवेत काम करण्याची संधी मिळाली. अनेक बाबी शिकायला मिळाल्या त्यांच्या कामाची शिस्त नेटकेपणा नियोजन, गती, सहजता, स्वरूप व हे समजले समोरच्या व्यक्तीला नेमके काय हवे आहे हे समजले की, त्यातून स्वाभाविक जुळणी होत जाते व पुढे जे घडत गेले ते सर्वज्ञात आहेच! पण एखादी बाब प्रत्येक निकषावर पूर्णपणे उतरल्याशिवाय पुढे जाणार नाही मग ती कितीही वेळा बदलावी लागली तरी चालेल एवढी परिपूर्णता बाळगणार! पूर्वनियोजन अंमलबजावणी व आढावा ही त्रिसूत्री आजही कायम आहे. काम करण्याची एक शिस्त असते ती त्यांच्या सहवासात शिकायला मिळाली.पण ताणतणावरहित !


श्रीगोंद्यातील रयत शिक्षण संस्थेला महाराजा महादजी शिंदे यांच्याकडून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्याला हातभार लावण्यासाठी संस्थेला अनेक एकर जमीन प्राप्त झालेली आहे. त्याचं संवर्धन करण्याचं शिवधनुष्य उचलण तसं कठीण काम होतं. येथील अतिक्रमण हा मोठा कळीचा मुद्दा असल्याने अनेकांनी भीमप्रयत्न करूनही अतिक्रमण हटवणं अतिशय कठीण प्रश्‍न बनला होता. अशावेळी नको त्या प्रसंगांना पण सामोरे जाण्याचे धाडस या मुख्याध्यापकांने केले. प्रसंगी काही समाज कंटकी प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला. अगदी अटक करण्यापर्यंत मजल गेल्यानंतर कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता केवळ आपण रयत शिक्षण संस्थेचे एकनिष्ठ सेवक व कर्मवीरांचा एक प्रामाणिक पाईक म्हणून काम करत आहोत. या भावनेने आलेल्या प्रसंगाला सामोरे जाताना मानसिक शारीरिक व आर्थिक झळ होत असताना देखील हा लढा त्यांनी हिकमतीने लढला आणि जिंकलाही. संस्थेने आणि सत्य जाणार्‍या शिक्षण प्रेमी समाजानेही त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. सत्यमेव जयते या न्यायाने सरांच्या बाजूने न्याय देवतेने निकाल दिला. सत्याचा विजय झाला. असे वाईट प्रसंगही त्यांनी समर्थपणे पेलले. असे धाडस फक्त तेच करू शकतात असे मला वाटते. हे पण संयमाने आणि हिमतीने केले.


याच विद्यालयात प्रथम शाखा स्तरावर गुणवत्ता विकास कक्षाची स्थापना केली. पुढे विभागीय अधिकारी झाल्यावर विभागीय गुणवत्ता कक्षाची स्थापना करून प्रत्येक शाळेत गुणवत्ता विकास कक्ष स्थापन केला व इच्छुक शिक्षक हेरून एक टेक्नोसेव्ही शिक्षकांची टीम निर्माण केली आणि गुणवत्ता हा एकच ध्यास समोर ठेवून सर्व सेवकांच्या मदतीने स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश प्राप्त करून गेल्या तीन वर्षांत 17 कोटी पेक्षा अधिक रुपयांची शिष्यवृत्ती मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या मदतीने विभागाला मिळवून दिली हे विशेष! एसएससी बोर्डाचा निकाल शंभर टक्केच ही त्यांच्या दृष्टीने सर्वसाधारण बाब पण कोणताही गर्व, अभिनिवेश न ठेवता सारे श्रेय सहकार्‍यांना दिले. गुणवत्ते शिवाय क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक स्पर्धा राष्ट्रीय स्पर्धा अभ्यास इतर व विविध गुणदर्शनामध्येही संस्था पातळीवर त्यांचे विद्यार्थी चमकलेले आहेत.


संस्थेने त्यांच्या कामाची कदर करून त्यांना लाईफ वर्कर मधून मॅनेजिंग कौन्सिल सदस्यपदी निवडले. ही एक अनमोल संधी त्यांना संस्थेने बहाल केली. मिस्किल, खेळकर व खिलाडू वृत्ती हा त्यांचा एक स्वभाव विशेष! कुणाला पुरस्कार मिळाला, कुणाचे अक्षर वळणदार असेल, कुणी छान भाषण केले, कुणी छान लेखन केले, किंवा कोणतेही उत्तम काम जर कुणी केले तर मिस्किलपणे सर काय म्हणणार ! यांना कुणी शिकवले? विचारा ना? (याचा अर्थ) म्हणजे मीच! यात मोठेपणा आहे. हा शब्बासकी देण्याचा विनोदी पुरस्कारच! हे वाक्य माझ्यासाठी पारितोषिक व प्रेरणाच होती. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य कोणत्याही समस्येला प्रश्‍नाला उत्तर आहे. समस्येला सामोरे न जाता हात पाय गाळून बसणे म्हणजे शरणागती पत्करणे होय! चूक दुरुस्त करता येऊ शकते पण पुन्हा चुकत राहणे व चुकते म्हणून कामच टाळणे हे गैर! सरांच्या कामाचा आवाका राष्ट्रीय पातळीपर्यंत आहे राष्ट्रीय शिक्षा माध्यमिक अभियान अंतर्गत मार्गदर्शन केलेले आहे क्षमताधिष्ठीत प्रशिक्षण असो किंवा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा यावर चर्चासत्रे आयोजित केली. शिक्षक मुख्याध्यापक यांच्यासाठी उद्बोधन वर्ग घेतले. पुरस्कार हे त्यांच्या दृष्टीने कधीच विशेष महत्त्वाचे नव्हते आपले विद्यार्थी आपली शाखा आपली संस्था खर्‍या अर्थाने प्रसिद्धीच्या झोतात येणे गुणवत्तेत पुढे येणे यापेक्षा दुसरा पुरस्कार त्यांनी कधी मानला नाही प्रसिद्धीला लांब राहून केवळ विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून त्याच्यासाठी सेवाकाळ घालवत फक्त गुणवत्ता हाच निधीध्यास घेऊन एक कृतिशील मुख्याध्यापक म्हणून ते ओळखले जातात.


पुरस्काराने माणूस मोठा होतो किंवा पुरस्कार न मिळाल्याने मोठा होत नाही असे कधीच होत नाही, परंतु विद्यार्थ्यांना घडवून त्यांचा सर्वांगीण विकास करणे आणि त्यांचा फीडबॅक मिळणे यापेक्षा दुसरा पुरस्कार काय तो असावा? आणि खर्‍या अर्थाने त्यांचे हजारो विद्यार्थी हाच त्यांचा मोठा खरा पुरस्कार आहे. असे ते मानतात. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती होणे म्हणजे सर्वसामान्य शिक्षकांना खर्‍या अर्थाने प्रतिनिधित्व मिळणं ! पण उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर रयत शिक्षण संस्थेमधील एक मोठा विभाग आणि त्या विभागामध्ये असलेल्या विविध शाखा शाखाप्रमुख भौतिक सुविधा विद्यार्थी गुणवत्ता विभागातील वेगवेगळे प्रश्‍न अशा अनेक समस्या आणि संस्थेच्या पाचही विभागांमध्ये गुणवत्तेसाठी चेष्टेचा विषय बनलेल्या उत्तरे विभागाला वैभव प्राप्त करून देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. सर्वांना समोरं जाणं आणि त्यातून गुणवत्ता सिद्ध करणे ही मोठी तारेवरची कसरत होती, परंतु विभागीय चेअरमन तथा उत्तर विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष गुणवत्तेसाठी अत्यंत आग्रही होते. मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, समन्वय समिती सदस्य शाखाप्रमुख आणि सर्वांच्या मदतीने आणि आपल्या दोन्ही सहकारी सहाय्यक विभागीय अधिकारी यांच्या संपूर्ण सहकार्याने हा विभाग प्रथम स्थानी आणण्यामध्ये सरांचा सिंहाचा वाटा आहे असे म्हणणे अतिशयोक्ती न ठरावे पण सर याचे श्रेय सेवकांना देतात हे नक्की! कारण सर्वांना विश्‍वासात घेऊन सर्वांना बरोबर घेऊन सहजपणे विकासाकडे जाणे त्याची तयारी करणे आणि प्रत्यक्ष कार्यवाही करणे खर्‍या अर्थाने मानवी सहसंबंधाशी असलेली नाती दृढ करण्यात त्यांना जे यश प्राप्त झालेले आहे. ते निश्‍चितच वाखाणण्यासारखे आहे. त्यामुळे सेवक हितचिंतक व एकूण समाजाचा रयत शिक्षण संस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होताना दिसतो. समतोल धोरण योग्य व्यक्तीला योग्य न्याय हे धोरण ठेवून पुढे जाणं तसं कठीण असताना सर्वांच्या सहकार्याने ते शक्य करता आले.
कन्हेरकर सर एक आगळे वेगळे रसायन ! माणसाची पारख करणारा रत्नपारखी! आणि माणसे जोडणारा सारथी ! एखाद्याची क्षमता ओळखून त्याच्याकडून पूर्ण क्षमतेने काम करून घेणारा आणि माणसा माणसातील सहसंबंध ओळखून प्रत्येकाच्या समस्या अडचणी आणि परिस्थितीचा विचार करून प्रत्येकावर पूर्ण विश्‍वास ठेवून सहज काम करून यशस्वीपणे सिद्धीस नेणारा एकमेव अधिकारी म्हणून माझा दृष्टिकोन नेहमीच त्यांच्याशी सकारात्मक राहिलेला आहे. परंतु एखाद्या व्यक्तीला अनेकदा सांगूनही त्याच्यावर काहीही परिणाम होत नसेल, तर त्याची खैर नाही असे प्रसंग ही मी पाहिले आहेत. पण पूर्वग्रह न ठेवता! मग तो आपला की परका याचा विचार नाही. नम्रता म्हणजे माघार नव्हे!गुणवत्ता ही कोठूनही मागवण्यासारखी वस्तू नाही ती अंगभूतच असावी लागते फक्त ती आपल्यात आहे ती हेरणं व कार्यरत करणे हे गमक ज्याला आलं तो गुणवत्ता विकास कक्षाच्या शिखरावर विराजमान झालाच म्हणून समजा असे ते नेहमीच म्हणतात! करता येऊ शकतं हे सिद्ध केले. म्हणूणच विभाग आघाडीवर आहे. संस्थेपुढे अनेक आव्हाने आहेत. भौतिक सुविधांचा, संस्थेच्या मालमत्तेचा, विद्यार्थी वाढीचा, शाळांच्या मान्यतांचा प्रश्‍न आहे. बदलत्या परिस्थितीमध्ये शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाऊन संस्थेची प्रत्येक शाखा टिकवणे तिचे संवर्धन करणे याही मोठ्या समस्या आपल्यासमोर आहे. लोकसहभागाचा प्रश्‍न हा मोठा प्रश्‍न आहे लोकांच्या धारणा मतप्रवाह दिवसेंदिवस बदलत चाललेले आहेत पालकाचा संस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. प्रत्येक पालकाला शाखेकडून संस्थेकडून शिक्षकाकडून गुणवत्ता हवी आहे. आणि या त्यांच्या अपेक्षा गैर नाहीत.


संस्थेत नवीन शिक्षकांची भरती होत आहे रयत संस्कृती हा एक वारसा आहे कर्मवीर ही वेगळी ओळख आहे याची जाणीव ही नव्या पिढीला होणं गरजेचं आहे. याचा आग्रह ते धरतात व रयतेची संस्कृती जपणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे हा विचार जपणं अंगिकारणं काळाची गरज आहे. शंभर वर्षांहून अधिक आयुष्य रयत शिक्षण संस्थेचं आहे आणि आज महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासामध्ये रयत शिक्षण संस्थेचा सिंहांचा वाटा आहे. माणसाने माणसांचा विकास म्हणजे संस्थेचा विकास हेच सूत्र आपणास अंगिकारावे लागेल.हा सरांचा आदर्श विचार आपल्याला निश्‍चितच विचार करायला लावतो.
कन्हेरकर सर एक सर्व समावेशक, निगर्वी आणि नम्र अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे एखादं काम कसं हाती घ्यावं आणि कसं तडीस न्यावं त्यांचं कसंब आणि ही कला निश्‍चितच वेगळी आहे. सेवानिवृत्ती किंवा सेवापूर्ती ही कृत्रिमता आहे कारण सेवा अनंत आहे सेवेची पूर्ती किंवा समाप्ती कधीच होऊ शकत नाही करताही येणार नाही फक्त सरकारी वय होतं आणि नोकरी जाते शासकीय व प्रशासकीय व्यवस्थेतून आपण अचानक बाहेर जातो. एक सेवा संपते आणि दुसरी सेवासुरू होते.


सेवानिवृत्ती ही एक संधी आहे आपण सेवाकाळात तळागाळातला विद्यार्थी पाहिला त्याची परिस्थिती अनुभवली त्याचे शिक्षणातून पुढे जाण्याची धमक पाहिली आणि परिस्थितीवर मात करून यश प्राप्त करण्यासाठी त्यानं केलेले प्रयत्न, धरसोड व मात, शिक्षकाने केलेले प्रयत्न हे पाहिल्यानंतर असं वाटतं की केवळ हार तुरे पुष्पगुच्छ शाली यामध्ये आर्थिक अपव्य करण्यापेक्षा त्याच किमतीचे शैक्षणिक साहित्य आणावे. सेवापूर्तीच्या निमित्ताने व शुभेच्छा देण्यासाठी मित्र परिवार व सहकार्यांनी आणलेले तेच शैक्षणिक साहित्य अनेक गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक वेगळी मदत निर्माण करेल. चैतन्य व आनंद मिळेल. हार तुरे शाली याची किंमत आणि शैक्षणिक साहित्याचे मूल्य वेगळे आहे. यापेक्षाही शुभेच्छा देणार्‍याच्या भावना ह्या फार महत्त्वाच्या मानून एक आवाहन करण्यात आलं की आपण शुभेच्छा पर गुलाब पुष्प ,शाल, श्रीफळ आणण्यापेक्षा एक शैक्षणिक वस्तू एक शैक्षणिक साहित्य आणा असे आवाहन या सेवासमापनाच्या निमित्ताने करायचं ठरलं आणि हीच खरी सेवा समाप्ती सेवार्थ सेवापूर्ती! तुमच्या शुभेच्छा थेट त्या शिकणार्‍या मुलापर्यंत जातील. त्याची गरज भागल्याचा आनंद अवर्णनीय असेल! असा हा एकमेव कर्मवीरांच्या विचारांचा वसा घेतलेला कर्मनिष्ठ रयत सेवक ! तथा पाईक म्हणजे नियम विधी काळ यांचे नियमितपणे पालन करणारा !


31 मे 2023 ही सरांच्या नोकरीला नियत वयोमानानुसार पूर्णविराम देण्याची तारीख! नोकरी संपते सेवा नाही. आज शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केले ते उद्या दुसरे एखादे क्षेत्र ही ते उत्तम चालवतील यात शंकाच नाही. सर म्हणजे एक चालतं बोलतं धडपड करणारं धाडसी व्यासपीठ आहे ते मात्र धडपड करीतच राहणार !
कर्मवीरांचे विचार पुढे घेऊन जाताना प्रत्येक प्रसंगाला समर्थपणे साथ देणार्‍या त्यांच्या सौभाग्यवतींचा त्याग व पाठिंबा विसरून चालणार नाही कारण तो पाठिंबा व समर्पण तेवढेच मोलाचे आहे जितके एखाद्या पुरुषाला जीवनात यश प्राप्त होते म्हणून आजच्या सेवापूर्तीनिमित्त सौ. व श्री कन्हेरकर सर यांना हार्दिक शुभेच्छा! आपणांस आयुरारोग्य लाभो हीच सदिच्छा !

एक सहकारी रयत सेवक!
काकासाहेब वाळुंजकर
सेवा निवृत्त मुख्याध्यापक
अहमदनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *