• Thu. Apr 24th, 2025

कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने पारनेर तालुक्यातील शेतकर्‍यांचे पिके धोक्यात

ByMirror

Feb 17, 2022

पुरेश्या दाबाने वीज पुरवठा करण्याची अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यात वीज पुरवठा कमी दाबाने होत नसल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत असून, त्वरीत वीज पुरवठा पुरेश्या दाबाने करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. येत्या पंधरा दिवसात वीज पुरवठा पुरेश्या दाबाने न झाल्यास स्थानिक शेतकर्‍यांसह महावितरण कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून, कोरोना व नैसर्गिक संकटामुळे त्याची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. पारनेर तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. कोरोनाच्या प्रादुर्भाव व अवकाळी पावसाने दोन वर्षापासून संपूर्ण जिल्ह्यासह पारनेर तालुक्यात शेतकर्‍यांची परिस्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत पारनेर तालुक्यात महावितरणच्या मनमानी कारभाराने शेतकर्‍यांना पुरेश्या दाबाने वीज मिळत नसल्याने पाणी असून, शेतातील पिक जगवणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये जगावे की आत्महत्या करावी? हा प्रश्‍न निर्माण झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
थकित वीज वसुलीला सुद्धा स्थानिक शेतकर्‍यांनी चांगला प्रतिसाद दिला. राज्य सरकारने वीज बिल वसुली मधील 30 टक्के निधी गावात विकासासाठी देणार असल्याची घोषणा केली होती. तो निधी कोठे गेला? असा प्रश्‍न सर्व शेतकरी विचारत आहे. वीज बिले भरून सुद्धा विजेच्या लपंडावामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने पिकांचे नुकसान होत आहे. यापूर्वी पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला, वीजेमुळे सर्व पिके धोक्यात आली आहे. शेतकर्‍यांना महावितरणने आत्महत्या करण्याची वेळ आनली असल्याचे म्हंटले आहे. शेतकर्‍यांची पिके वाचविण्यासाठी त्वरीत वीज पुरवठा पुरेश्या दाबाने करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *