कुंभकार ग्रुपच्या वतीने सत्कार
घोडके यांची झालेली नियुक्ती समाजासाठी भूषणावह -मा. प्रा. बाळसाहेब वाकचौरे
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते नितीन कान्होबा घोडके यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) शहर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कुंभकार ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी प्राचार्य बाळसाहेब वाकचौरे, सुधाकर देवतरसे, राजापुरे, केरू डोखे, ॲड. अभय राजे, उज्वला राजे, ताराबाई देवतरसे, ॲड. अश्विनी राऊत, माजी मुख्याध्यापक राजेंद्र गोरे, उद्योजक खुशाल जाधव, सुहास लवलेकर आदींसह समाजबांधव व महिला उपस्थित होत्या.
नितीन घोडके विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहे. त्यांचा असलेला जनसंपर्क व समाजात काम करण्याची तळमळ पाहून आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी नुकतीच त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
माजी प्राचार्य बाळसाहेब वाकचौरे म्हणाले की, नितीन घोडके यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची झालेली नियुक्ती सर्व समाजासाठी भूषणावह आहे. ते मिळालेल्या पदाच्या माध्यमातून गरजूंना आधार देण्यासह त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्य करणार असल्याचा विश्वास व्यक्त करुन घोडके यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना नितीन घोडके यांनी सर्वसामान्यांची प्रश्न सोडविण्यासह शासकीय योजनांचा त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून कार्य केले जाणार आहे. तर समाजातील विविध अडीअडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. घोडके यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.