• Wed. Jul 16th, 2025

ज्येष्ठांच्या अंधकारमय जीवनाला मिळाली प्रकाशवाट

ByMirror

Jan 15, 2025

डोळ्यांवर शस्त्रक्रिया होवून संक्रांतीनिमित्त शहरात परतलेल्या ज्येष्ठांचे तिळगुळ देऊन स्वागत

नगर (प्रतिनिधी)- डोळ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया होवून शहरात परतलेल्या गरजू घटकातील ज्येष्ठ नागरिकांचे फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने स्वागत करण्यात आले. पुणे येथील हॉस्पिटलमध्ये डोळ्यांवर मोतीबिंदू, काचबिंदूच्या शस्त्रक्रिया यशस्वी होवून मकर संक्रांतीनिमित्त शहरात आगमन झालेल्या ज्येष्ठांना फिनिक्सचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी तिळगुळ देवून शुभेच्छा दिल्या. अनेक ज्येष्ठ नागरिकांना नवदृष्टी मिळाल्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. तर एका ज्येष्ठ नागरिकाने त्याच्या कुटुंबातील तब्बल दहा व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेऊन दृष्टी मिळाले असल्याची भावना व्यक्त केली.


फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून दर महिन्याला नागरदेवळे (ता. नगर) येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेऊन दृष्टीदोष असलेल्या गरजूंवर मोतीबिंदू, काचबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या जात आहे. या उपक्रमाद्वारे गरजू ज्येष्ठांना नवदृष्टी देण्याचा उपक्रम सातत्याने सुरु आहे. नुकतेच झालेल्या शिबिराच्या माध्यमातून 47 ज्येष्ठ नागरिक व महिलांना पुणे येथील के.के. आय बुधराणी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले होते. त्यांच्यावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया होवून ते शहरात परतले आहेत.


खर्चिक शस्त्रक्रियेचा भार पेलवत नसल्याने फिनिक्सचे शिबिर सर्वसामान्यांसाठी आधार ठरत आहे. या शिबिरातून शस्त्रक्रिया झालेल्या ज्येष्ठांना नवदृष्टी मिळाली असून, त्यांचे जीवन प्रकाशमय झाले आहे. वंचित, दुर्बल घटकातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन प्रकाशमान करुन त्यामध्ये रंग भरण्याचे काम फिनिक्स करत आहे.
शस्त्रक्रिया करुन परतलेल्या ज्येष्ठांनी उत्तम प्रकारे पाहता येत असल्याचा आनंद व्यक्त केला. अंधारलेले जीवन प्रकाशमय करण्यासाठी मदतीचा हात देणारे जालिंदर बोरुडे यांना जवळ घेऊन अनेक वृध्दांनी त्यांना आशिर्वाद दिले. तर नवदृष्टीच्या आनंदाने अनेकांचे डोळे देखील पाणावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *