तो पर्यंत सुनिल साळवे राहणार प्रभारी जिल्हाध्यक्ष
राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचा खुलासा
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष पदावरुन निर्माण झालेल्या वादावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी अखेर पडदा टाकला. नवीन जिल्हाध्यक्ष निवडून येत नाही, तो पर्यंत सुनील साळवे प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार व माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.
संविधान सन्मान महामेळाव्यानिमित्त शहरात आलेले ना. आठवले यांची सोमवारी (दि.2 सप्टेंबर) शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आरपीआयचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य सचिव राजाभाऊ कापसे, प्रभारी दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, किरण दाभाडे, विवेक भिंगारदिवे, नगरसेवक राहुल कांबळे, योगेश त्रिभुवन, अविनाश भोसले, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, गौरव साळवे, बंटी गायकवाड, अजय आंग्रे, बाबा राजगुरु, सतीश मगर, बाळासाहेब शिंदे, विशाल घोडके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दक्षिण जिल्हाध्यक्ष पदावरुन संजय भैलुमे यांनी कार्यकारिणी बरखास्त नसून, स्वत: जिल्हाध्यक्ष पदावर कायम असल्याचा दावा केला होता. तर राज्य उपाध्यक्ष वाकचौरे व भालेराव यांनी शहरात बैठक घेऊन कार्यकारिणी बरखास्त करुन सुनिल साळवे यांच्याकडे प्रभारी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती. यावरुन पक्षातील आरोप-प्रत्यारोपानंतर गटबाजी चव्हाट्यावर आली होती. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. आठवले यांना पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष पदावरुन प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी या वादावर पडदा टाकत जिल्हाध्यक्ष पदाची निवडणुक होईपर्यंत प्रभारी जिल्हा अध्यक्ष म्हणून सुनील साळवे राहणार असल्याचे स्पष्ट केले.
आठवले म्हणाले की, अनेक वर्षापासून जिल्हाध्यक्ष म्हणून सुनील साळवे काम करत आहे. इतरांना देखील संधी मिळावी म्हणून सभासद नोंदणी नंतर दोन महिन्यांनी निवडणूक घेतली जाणार आहे. निवडणुकीने नवीन दक्षिण जिल्हाध्यक्ष निवडला जाणार आहे व नवीन कार्यकारणी जाहीर केली जाणार असल्याचे सांगितले. वाकचौरे व भालेराव यांनी कार्यकारणी बरखास्तच्या घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करुन दक्षिण जिल्हाध्यक्ष पदावरुन सुरू असलेल्या गटबाजीला त्यांनी पूर्णविराम दिला.