वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण 15 ते 20 मे च्या दरम्यान सुरू होणार
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक माध्यमिक व प्राथमिक यांच्या समवेत नुकतीच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकार्यांसोबत झालेल्या सहविचार सभेत विषय पत्रिकेतील 32 प्रलंबीत प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. तर त्यातील 18 प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षण विभागाने तयारी दर्शवली असून, याबाबत संबंधित अधिकार्यांना निर्देश देण्यात आले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
या बैठकिसाठी शिक्षक आमदार तथा शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांना 32 प्रश्नांची विषय पत्रिका सादर करुन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांचे विविध प्रश्न मांडले होते. या सर्व विषयांवर बैठकित चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, शिक्षण संचालक महेश पालकर, शिक्षक आमदार गाणार, माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, सरकार्यवाह नरेंद्र वातकर, बाबासाहेब काळे, पूजाताई चौधरी, राजेंद्र नागरगोजे, राजेंद्र सूर्यवंशी, बी.जी. शिंदे, शिवाजी सागडे, रंजनाताई कावळे, सुमन हिरे, महाजन, किरण देशपांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
संचमान्यता दुरुस्ती प्रस्ताव मान्यता साठी शासनास पत्रव्यवहार करणार, तुकडीनिहाय शिक्षकांची पदे मंजुरीबाबत माननीय शिक्षणमंत्री व सर्व शिक्षक आमदार यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येणार, पवित्र पोर्टल परीक्षा बाबत काटेकोरपणे अंमलबजावणी होणार, शिक्षकांना 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजने साठी किती आर्थिक भार लागेल? या संदर्भातील माहिती गोळा करण्यात येत आहे. येत्या एक ते दीड महिन्यात या संदर्भाचा अहवाल शासनाकडे सादर होणार, डीसीपीएस व एनपीएस अथवा जीपीएफ खाते नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी रोखीने देण्यासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करणार, टप्पा अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना नियमित वेतन मिळण्यासाठी लेखाशीर्ष वेगळा करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली, सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता देण्यासंदर्भात कार्यवाही होणार, प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत थकीत बिल वेतन पथकास सादर करणे व वेतन पथकाने ते मंजूर करणे व निधी उपलब्धतेनुसार खात्यावर जमा होणार आहे, वैद्यकीय प्रतिपूर्ती खर्च पाच लाखांपर्यंत शिक्षणाधिकारी स्तरावर मान्यता मिळण्यासंदर्भात शासनाकडे शिफारस करणार, शिक्षकांचे समायोजन समान टप्प्याच्या शाळेवर होणार, रात्रशाळेतील शिक्षकांच्या सेवा पूर्णवेळ धरण्यासंदर्भात समितीचे गठण झाले अअसून, लवकरच निर्णय अपेक्षित, अर्धवेळ ग्रंथपालांना पूर्णवेळ ग्रंथपाल पदावर उन्नत करण्याबाबत दोन किंवा तीन शाळा मिळून पूर्णवेळ ग्रंथपाल पद देण्यात येणार, दरवर्षाच्या मार्च महिन्याच्या वेतनावर वेतनेतर अनुदान देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली या संदर्भात शासनास प्रस्ताव पाठवले असल्याचे स्पष्ट करण्यात आले, शाळांना सोलर सयंत्र मिळावे यासाठी आमदार विकास निधीमध्ये याचा समावेश करणार, वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण 15 ते 20 मे च्या दरम्यान सुरू होईल व या प्रशिक्षणाचे उद्घाटन शिक्षणमंत्री यांच्या हस्ते होणार अशी माहिती या बैठकित देण्यात आली.