देशात भांडवलशाहीबरोबर हुकुमशाही निर्माण झाल्याने श्रमिकांना हक्कासाठी संघर्ष करावा लागणार -कॉ. कारभारी उगले
शहरातून मोठ्या संख्येने विडी कामगार राज्य अधिवेशनाला जाणार
अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात भांडवलशाहीबरोबर हुकुमशाही निर्माण झाल्याने श्रमिकांना आपल्या हक्कासाठी लढा उभारुन संघर्ष करावा लागणार आहे. विडी कामगारांची अवस्था बिकट झाली असून, त्यांना देशोधडीला लावण्याचे काम सत्ताधारी करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशनचे राज्याध्यक्ष कॉ. कारभारी उगले यांनी केले.
विडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर 28 ऑगस्ट रोजी नांदेडला महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशनचे राज्य अधिवेशन होत असून, या पार्श्वभूमीवर शहरातील तोफखाना येथे विडी कामगारांची बैठक पार पडली. यामध्ये कॉ. उगले अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी लालबावटा विडी कामगार युनियनचे जिल्हा सचिव अॅड. कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्षा भारती न्यालपेल्ली, इंटकच्या कविता मच्चा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे कॉ. उगले यांनी नांदेड येथील पिपल्स कॉलेज येथे नरहर कुरुंदकर सभागृहात एक दिवसीय राज्य अधिवेशनात विविध जिल्ह्यातून विडी कामगार व संघटनेचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, शहरातील विडी कामगारांना त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
अॅड. सुधीर टोकेकर यांनी नांदेडचे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी शहरातील विडी कामगारांचा पुढाकार राहणार असल्याचे सांगितले. शहरात झालेल्या बैठकीसाठी लक्ष्मीबाई कोटा, संगिता कोंडा, सगुणा श्रीमल, शारदा बोगा, रेणुका अंकारम, शोभा बिमन, माया चिलका, लिलाबाई भारताल, सरोजनी दिकोंडा, कमलाबाई दोंता आदींसह विडी कामगार महिला उपस्थित होत्या.
नांदेडच्या अधिवेशनात आयटकचे राज्य सचिव शाम काळे, कॉ. उदय चौधरी, इंटकचे विनित पाऊलबुध्दे उपस्थित राहणार आहे. 27 ऑगस्ट रोजी फेडरेशनचे पदाधिकारी व कार्यकारणीची बैठक होणार असून, या बैठकित विडी कामगारांच्या देश, राज्य व जिल्हास्तरीय प्रश्नांवर चर्चा होणार आहे. केंद्र सरकारचे तंबाखू विरोधी धोरण, राज्य सरकारची सध्याची परिस्थिती, मालकांची धंद्याकडे पाहण्याची मानसिकता व विडी कामगार वर्गाचे विविध प्रश्न या विषयावर चर्चा करुन, दुसर्या दिवशी होणार्या अधिवेशनात सदरील प्रश्नांवर चर्चा करुन पुढील ध्येय-धोरण व दिशा ठरविण्यात येणार आहे.