पालकमंत्री मुश्रीफ यांच्याशी भिंगार शहराध्यक्ष सपकाळ यांची चर्चा
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार छावणी परिषदेतील विविध नागरी प्रश्न सोडविण्यासाठी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, युवक उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, ओबीसी सेलचे अमित खामकर, अल्पसंख्यांक सेलचे साहेबान जहागीरदार, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, गणेश बोरुडे, लहू कराळे, दीपक बडदे आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या नगरपालिका निवडणूक आढावा बैठकीत सपकाळ यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री मुश्रीफ यांची भेट घेऊन नागरी प्रश्नाबाबत चर्चा केली. केंद्र सरकारकडून भिंगार छावणी परिषदेला पुरेसा निधी येत नसल्याने अनेक विकास कामे ठप्प आहेत. 25 ते 30 हजार लोकसंख्या असलेल्या छावणी हद्दीतील नागरिक या समस्यांना तोंड देत असून, काही प्रश्न आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याने सोडविण्यात आले आहेत. या भागातील इतर प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजन समिती व पर्यटन विकास मधून निधी उपलब्ध करून देण्याची प्रमुख मागणी सपकाळ यांनी केली. निधीची कमतरता असल्यामुळे कॅन्टोमेंटची कुठलीही विकास कामे होऊ शकलेली नाही. त्यामुळे नागरिकांना सोयी सुविधांपासून वंचित रहावे लागते. येथील कामासाठी 25 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिल्यास महत्त्वाचे प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.