• Fri. Sep 19th, 2025

स्वयंसेवी संस्थांच्या वतीने शाहू महाराजांना अभिवादन

ByMirror

Jun 26, 2023

व्याख्यानातून शाहू महारांच्या पुरोगामी विचारांचा जागर

बहुजनांचा आधार व थोर लोकराजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज -अ‍ॅड. महेश शिंदे

अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजनांचा आधार व थोर लोकराजा म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज होय. दीनदुबळ्या रयतेसाठी सत्ता राबविणारा खरा लोकनायक म्हणून त्यांनी कार्य केले. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात अनेक सामाजिक सुधारणा घडविल्या. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करुन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य त्यांनी केल्याचे प्रतिपादन जय युवा अकॅडमीचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे यांनी केले.


नेहरू युवा केंद्र, जय युवा अकॅडमी, प्रगती फाउंडेशन, उडाण फाउंडेशन, उमेद सोशल फाउंडेशन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय संस्था व रयत प्रतिष्ठानच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान व अभिवादन कार्यक्रमात अ‍ॅड. शिंदे बोलत होते. जुने कोर्ट येथील जय युवा संस्थेच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी विजय भालसिंग, अश्‍विनी वाघ, आनंद वाघ, आरती शिंदे, नितीन डागवले, मेघा पाटसकर, प्रवीण पाटसकर, अनिल साळवे, दिनेश शिंदे, पोपट बनकर, रावसाहेब काळे आदी उपस्थित होते.


प्रारंभी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विजय भालसिंग म्हणाले की, मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वप्रथम आरक्षण कोल्हापूर संस्थानात दिले गेले. शाहू महाराजांनी चुकीच्या प्रथा बंद केल्या, विधवा विवाहास कायदेशीर मान्यता दिली, शेती व उद्योगधंद्यास चालना देऊन अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविले, बाजारपेठा वसविल्या या सामाजिक कार्याबरोबर संगीत, नाट्य, कला, मल्लविद्या यासारख्या कलांना राजाश्रय देण्यात आला. त्यांच्या कार्यातून आदर्श घेऊन सामाजिक संस्थेने कार्य करण्याचे त्यांनी आवाहन केले.


अनिल साळवे म्हणाले की, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या हाती असलेल्या राजसत्तेचा उपयोग आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी केला. त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सढळ हाताने मदत केली. राजर्षी शाहू महाराज हे पुरोगामी आणि क्रांतिकारी विचाराचे होते. सामाजिक विषमता दूर करण्यासाठी त्यांनी सतत संघर्ष केला. शिक्षणाची व नोकरीची संधी सर्वसामान्यांना निर्माण करून दिली. त्यांचे विचार व कार्य समाजाला दिशा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्‍विनी वाघ यांनी केले. आभार दिनेश शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *