अनेक प्रकरणात ते दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्याची अन्याय निर्मूलन सेवा समितीची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर सैनिक बँकेत गेल्या सात वर्षात संचालक मंडळाने व कर्मचाऱ्यानी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केला. अनेक प्रकरणात ते दोषी आढळले असताना देखील संचालक मंडळावर व कर्मचाऱ्यांवर सहकार खात्याने अद्याप कुठलीही करवाई केलेली नाही. संबंधितांवर कारवाई होण्याच्या मागणीसाठी सोमवार (दि.14 ऑगस्ट) पासून अन्याय निर्मूलन सेवा समितीच्या वतीने उपोषण केले जाणार असल्याची माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिली. या संदर्भात समितीने सहकार खात्याला पत्र पाठविले आहे.
संचालक व कर्मचारी यांनी कर्जत शाखेत बोगस चेक वटवून 1 कोटी 79 लाख रुपयाचां अपहार करत शासकीय रक्कम हडप केली. ही रक्कम व इतर 9 मुद्द्यांचे लेखापरीक्षण विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 आर. एफ. निकम करत आहेत.परंतु या कामात दिरंगाई झाली असून, त्वरीत सैनिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे, चेअरमन व संचालक मंडळावर रक्कमेची जबाबदारी निश्चित करून रक्कम वसुल करावी. संचालकांनी स्वताच्या नातेवाईकानां पुन्हा पुन्हा बँक सेवेत घेतले जात आहे. त्यामुळे सदर नातेवाईक नियमबाह्य कर्मचारी भरतीच रद्द करून घेतलेल्या त्या सर्व नातेवाईकांना सेवेतून कमी करण्यात यावे. पारनेर सैनिक बँकेचे सर्व सभासद मतदानास पात्र असताना व अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असताना सभासदांची दिशाभूल करण्यासाठी अध्यादेशचे उल्लंघन करून क्रियाशील होण्याची बेकायदेशीर नोटीस पाठविण्यात आल्याने झालेला टपाल खर्च मुख्य कार्यकारी अधिकारी संचालक मंडळाकडून वसूल करुन कारवाई करण्यात यावी. बँकेतील शाखा पारनेर येथील कर्जदार पटेल आणि चेमटे यांना तारण नसताना 1 कोटी 50 लाखाचे असुरक्षित कर्ज वाटप केल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोरडे, संचालक मंडळाकडून सदर रक्कम वसूल करावी. पारनेर शाखेतील खाते क्र 1015 विनातारण 6 लाख कर्ज, कर्ज खाते क्र.122/9552 चे 70 लाख कर्ज विनातारण असताना या खात्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळाने गेली अनेक वर्ष कोणतीही कारवाई न केल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळाला जबाबदार धरून रक्कम वसुलीची कारवाई करण्याची मागणी सहकार खात्याला पाठविण्यात आलेल्या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या भरती बाबतच्या अटींचे उल्लंघन करत बेकायदेशीर जाहिरात प्रसिद्ध केल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक मंडळावर कारवाई करण्यासाठी संघटना आग्रही आहे. या सर्व मुद्दयांवर कारवाई होण्यासाठी समितीच्या वतीने उपोषण केले जाणार आहे.
त्वरीत कारवाई करून बँक वाचवा
सैनिक बँकेत चेअरमन, संचालक व मुख्यकार्यकारी अधिकारी आदी भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांनी गेली अनेक वर्ष बँकेत गैरव्यवहार करत बँकेचे आर्थिक नुकसान केले. या बाबतही चौकश्या झाल्या, परंतु कारवाई झालीच नाही. कारवाई होण्यासाठी सभासादांनी अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे. त्वरीत सहकार खात्याने कारवाई करून सुरु असलेल्या अपहार, भ्रष्टाचार, गैरकारभाराला लगाम घालावा व बँक वाचविण्याची भावना बाळासाहेब नरसाळे, विनायक गोस्वामी, मारुती पोटघन, विठ्ठल वराळ, विक्रम कळमकर, दत्तात्रय भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.