युवा शक्ती व श्रमिक कामगारांच्या बळावर महाराष्ट्राची विकासात्मक वाटचाल -अॅड. अनुराधा येवले
अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक आव्हानांचा सामना करत आज महाराष्ट्र राज्य देशातील सर्वात विकसित राज्य म्हणून पुढे आला आहे. युवा शक्ती व श्रमिक कामगारांच्या बळावर महाराष्ट्राची विकासात्मक वाटचाल सुरु आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, परंपरा, तंत्रज्ञान आदी सर्वच बाबतीत महाराष्ट्रानं नेत्रदिपक कामगिरी केली आहे. देशात महाराष्ट्रीयन असल्याचे सांगताना अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन अॅड. अनुराधा येवले यांनी केले.
नगर-पुणे महामार्ग येथील सी.डी. देशमुख लॉ कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तर महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी अॅड. येवले बोलत होत्या. संस्थेचे सचिव ना.म. साठे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
प्रास्ताविकात प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य अॅड. रियाज बेग म्हणाले की, महाराष्ट्र पुरोगामी विचाराने पुढे जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक वारसा जपण्याचे काम महाराष्ट्रात करण्यात आले असल्याचे सांगितले. ना.म. साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची माहिती दिली.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका जबीन शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सारंग गंगोटे, प्रा. मिरा जानराव, विशाल राठोड, विनोद जाधव, सविता तांबे यांचे सहकार्य लाभले.