विधाते विद्यालयात वृक्षरोपण करुन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची जागृती
बिकट परिस्थितीतून व अडचणीतून मार्ग काढावा लागतो -अशोक कडूस
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाने पालक गमावलेल्या अनाथ मुला-मुलींचे शैक्षणिक पालकत्व, दिव्यांग-मुकबधीर मुलांना शैक्षणिक मदत तर सातत्याने समाजातील निराधार व गरजू घटकातील विद्यार्थ्यांना संवेदनशील मनाने नेहमीच मदत करणारे माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप केले. तर विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची आवड व जागृती करण्याच्या उद्देशाने शाळेच्या आवारात वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले.

सारसनगर येथील कै. दामोदर विधाते (मास्तर) विद्यालयात माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, लेखापरीक्षक मनोज शिंदे व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शालेय संस्थेचे सरचिटणीस प्रा. शिवाजीराव विधाते, वैभव ढाकणे, ऋषी ताठे, सागर गुंजाळ, पारगावचे सरपंच अमोल खेडकर, भुसार मार्केटचे संचालक राजू बोडखे, शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के आदींसह शालेय विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी अशोक कडूस म्हणाले की, अपमान व अपयश पचविण्याची क्षमता ज्यांच्यात निर्माण होते, तो पुढे यशस्वी होतो. जीवनात ध्येय गाठण्यासाठी परिश्रम व कष्ट करण्याची तयारी ठेवावी. सामर्थ्य, बुद्धिमत्ता व परिश्रम अंगीकारल्यास कोणत्याही क्षेत्रात यश निश्चित आहे. बिकट परिस्थितीतून व अडचणीतून मार्ग काढावा लागतो. गुणवत्ता असल्यास आर्थिक परिस्थिती यशात अडकाठी ठरत नाही. विद्यार्थ्यांनी जीवनाची दिशा व ध्येय ठरवण्याचे त्यांनी आवाहन केले. तर समाजात गरजू विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असणारे बोडखे यांच्या सारखे शिक्षक निर्माण झाल्यास समाजाचा सर्वांगीन विकास होणार असल्याचे स्पष्ट करुन, त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. लेखापरीक्षक मनोज शिंदे यांनी समाजाचे ऋणातून उतराई होण्याच्या दृष्टीने व आपल्या विद्यार्थी दशेतील आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून बोडखे सर राबवित असलेल्या उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
बाबासाहेब बोडखे म्हणाले की, ज्ञान व आत्मविश्वासाने बिकट परिस्थितीवर मात करता येते. वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना जीवनात उभे करण्याचे काम केले जात आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य असून, त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी शैक्षणिक मदतीचा हात दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. माणिक विधाते यांनी यापूर्वी बोडखे यांनी अतिवृष्टी झालेल्या पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी केलेली शैक्षणिक मदत व कोरोनात पालक गमावलेल्या मुलांचे शैक्षणिक पालकत्वाचे उपक्रम दिशा देणारे असल्याचे सांगितले.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना शालेय दप्तरचे वाटप करण्यात आले. तर शाळेच्या संरक्षण भिंती लगत वृक्षरोपण करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत प्रा. शिवाजीराव विधाते यांनी केले. प्रास्ताविकात अमोल मेहेत्रे यांनी शाळेच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधाकिसन क्षीरसागर यांनी केले. आभार भाऊसाहेब पुंड यांनी मानले.