मोबदला न मिळालेल्या मुळा धरणाच्या प्रकल्पग्रस्त शेतकर्यांना कसत असलेल्या जमीनीचा मालकी हक्क द्या
मंजूर कर्ज प्रकरणे नाकारणार्या त्या बँकेच्या मॅनेजरवर कारवाई करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुळा धरण बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शेतकर्यांच्या जमिनी संपादित करुन मोबदला न दिलेल्या शेतकर्यांना ते सध्या कसत असलेल्या शेत जमीनीच्या उतार्यावर त्यांचे नाव लावून त्यांना मालकी हक्क द्यावा व जिल्हा उद्योग केंद्र तसेच महात्मा फुले महामंडळामार्फत मंजूर कर्ज प्रकरणे नाकारणार्या त्या नॅशनल बँकेच्या मॅनेजरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सह्याद्री छावा संघटनेच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्यात आले.
या उपोषणात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब काळे, विनोद साळवे, सहादू दौंदे, पोपट दौंदे, विजय जगताप, सिध्दार्थ पाटोळे, आशा दोंदे, सिंधू साळवे, इंदू पंडित, ज्योती पाटोळे, सविता जगताप, हिराबाई जाधव, रमाकांत दौंदे, अश्विनी पंडित, सागर साळवे, मिलिंद गायकवाड, अविनाश कांबळे, दत्ता वामन, राम कराळे आदी सहभागी झाले होते.
महादू दोंदे व भीमा दोंदे या शेतकर्यांची 1964 मध्ये 6 एकर 24 गुंठे जमीन मुळा धरण बांधण्याकरिता संपादित केली होती. परंतु संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला अद्याप पर्यंत या शेतकर्यांना मिळालेला नाही. सदर शेतकरी अडाणी असल्याने त्यांना मोबदला शासनाकडून मिळवता आलेला नाही.
मुळा धरणात जमीन गेल्यानंतर प्रकल्पग्रस्तांनी उदरनिर्वाहासाठी धरणाच्या वरील बाजूस असलेल्या वनविभागाची जमीन काबीज करून, पेरी मध्ये पिके लावली. सदर जमिनी कायम वहिवाटीस देण्यासारखी आहे. या प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबीयांची उपजीविका शेत जमीनीवर अवलंबून आहे. ते ते सध्या कसत असलेल्या शेत जमीनीच्या उतार्यावर त्यांचे नाव लावून त्यांना मालकी हक्क देण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच भाऊसाहेब साळवे यांनी तेल प्रक्रिया उद्योगसाठी कर्जाचे प्रकरण जिल्हा उद्योग केंद्र यांच्याद्वारे युनियन बँकेकडे दाखल केले होते. सारसनगर मार्केटयार्ड येथे शाखेत या प्रस्तावाची पडताळणी बँक मॅनेजर यांनी केली असता साळवे यांना कर्ज मंजूर करण्याचे आश्वासन दिले. तत्पूर्वी स्थळ पाहणी करायची आहे थोडे थांबावे लागेल असे सांगितले. परंतु बँक मॅनेजरची बदली झाल्यामुळे त्या जागी नवीन मॅनेजर म्हणून आले. या बँकेत जाऊन साळवे यांनी कर्ज प्रकरणाची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन कर्ज देण्यास टाळाटाळ सुरु केली आहे.
याच बँकेच्या वडगाव गुप्ता शाखा येथे विजय जगताप यांनी महात्मा फुले महामंडळातंर्गत भाजीपाला विक्री व्यवसायासाठी कर्ज प्रकरण सादर केले होते. तेथील मॅनेजरनेदेखील कर्ज मंजूर झालेले असताना कर्ज देण्यास टाळाटाळ केली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या बँकेच्या दोन्ही मॅनेजरची चौकशी करुन गोरगरिबांचे कर्ज त्वरित मंजूर करून देण्याची मागणी सह्याद्री छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.