अहमदनगर सराफ सुवर्णकार संघटनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
कुलथे यांच्या मालकीचा भूखंड कमी रकमेत हडपण्यासाठी खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रतिष्ठित सराफ व्यावसायिक मयूर दिलीप कुलथे यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या दरोड्याचा खोट्या गुन्ह्याचा योग्य तपास करुन न्याय मिळण्याच्या मागणीसाठी अहमदनगर सराफ सुवर्णकार संघटनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी (दि.27 जुलै) जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. नवीपेठ येथील त्यांच्या मालकीचा भूखंड कमी रकमेत मिळावा या हेतूने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांची समाजात बदनामी करण्यात आली असल्याचा आरोप करुन त्यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी सराफ संघटनेचे प्रकाश डहाळे, सागर कायगावकर, शिवाजी पाटील, श्याम देडगावकर, वैजनाथ चिंतामणी, पांडुरंग दहिवाळ, प्रशांत बुर्हाडे, योगेश नांगरे आदी उपस्थित होते.
मयूर कुलथे हे शहरात सराफ व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नवीपेठ या ठिकाणी त्यांच्या मालकी हक्काचे जागा होती. ती इमारत बरीच जुनी असल्याने मोडकळीस आली होती. या इमारतीला महापालिकेने सदर धोकादायक घोषित केले होते. या पावसाळ्यात सदर इमारत ही जमीन दोस्त झाली. त्यावरील मटेरियल मयूर कुलथे यांनी काही कामगार लावून बाजूला केले व त्या जागेवर पत्र्याचे संरक्षक कंपाउंड टाकले. परंतु या परिसरातील काही राजकीय व्यक्तींनी तेथील भाडेकरूना चिथावणी देऊन, त्यांच्यावर दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. या प्रकरणातून समाजात त्यांची मोठी बदनामी करण्यात आली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सराफ व्यावसायिक मयूर कुलथे हे अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे सुवर्ण पिढीचा व्यवसाय करीत असून, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता दाखल करण्यात आलेला दरोड्याचा खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी अहमदनगर सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.