महाराष्ट्रातील सरपंचाचे प्रश्न सोडविण्यासाठी 22 मे पासून सरपंच परिषदेचे कराड ते मुंबई मंत्रालय धडक मोर्चा
दक्षिण जिल्हाध्यक्षपदी अर्जुन शेळके, उत्तर जिल्हाध्यक्षपदी जालिंदर गागरे, जिल्हा कार्याध्यक्षपदी शरद पवार व जिल्हा महिला समन्वयकपदी पूजा सूर्यवंशी यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सुकाणू समितीच्या अध्यक्षपदी हिंगणगाव (ता. नगर)चे सरपंच तथा जिल्हाध्यक्ष आबासाहेब पाटील सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. शिर्डी येथे झालेल्या राज्यस्तरीय सरपंच परिषदेच्या मेळाव्यात प्रमुख पदाधिकार्यांच्या उपस्थितीमध्ये ही निवड जाहीर करण्यात आली.
ज्येष्ठ समाजसेवक पद्मविभूषण अण्णा हजारे आणि पदमश्री पोपट पवार यांचे विचार व प्रेरणेने कार्यरत महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या सरपंच परिषदेचा राज्यस्तरीय मेळावा शिर्डीला उत्साहात पार पडला. या मेळाव्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून सरपंच, उपसरपंच हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सकाळ व संध्याकाळ दोन सत्रामध्ये झालेल्या मेळाव्यात सरपंच, उपसरपंच यांना मार्गदर्शन करण्यात आले.
सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्याप्रसंगी प्रदेश सचिव अॅड. विकास जाधव, अध्यक्ष अश्विनीताई थोरात, विश्वस्त सुप्रिया जेधे, राजीव पोतवीस, किसनराव जाधव, पांडुरंग नागरगोजे, सुधीर पठाडे, नारायण वनवे, संजय बापू जगदाळे, बुलढाणा जिल्हा प्रमुख प्राचार्य भक्ती पाटील सोनवणे, अॅड. दयानंद पाटील आदी उपस्थित होते.

पहिल्या सत्रात सरपंच परिषदचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे, विकास जाधव, आबासाहेब सोनवणे, अश्विनीताई थोरात, राज्य प्रसिद्धी प्रमुख संजयबापू जगदाळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राज्य, जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केली. राज्यातील सर्व सरपंचाच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी सरपंच परिषद कार्यरत राहण्याचा निर्धार पदाधिकार्यांनी व्यक्त केला.
दुसर्या सत्रात सरपंच परिषदेचे पदाधिकारी नुकत्याच झालेल्या राज्याच्या अनेक बाजार समितीवर निवडून आले असून, त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तर नियुक्ती झालेल्या पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. राज्य कार्यकारणीतील सचिव विकास जाधव यांची राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड जाहीर करण्यात आली तसेच सचिवपदी कोल्हापूरचे राजीव पोतनीस यांची नियुक्ती करण्यात आली. अहमदनगर जिल्हाध्यक्ष पद सांभाळणारे आबासाहेब पाटील सोनवणे यांची राज्याचे अत्यंत महत्त्वाचे समजल्या जाणार्या कोअर कमिटीच्या (सुकाणू समिती) अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. या सुकाणू समितीमध्ये 21 जणांची कार्यकारणी असेल, या समितीमध्ये राज्यातील अनुभवी कार्यक्षम सरपंच व भगिनींना स्थान देण्यात येणार असल्याचे आबासाहेब सोनवणे यांनी सांगितले.
अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी थिटे सांगवी (ता. श्रीगोंदा) चे सरपंच अर्जुन शेळके, उत्तर जिल्हाध्यक्षपदी आंबीदुमाला (ता. संगमनेर) येथील सरपंच जालिंदर गागरे, जिल्हा कार्याध्यक्षपदी चिचोंडी पाटील (ता. नगर) चे सरपंच शरद खंडू पवार तर चांदे बुद्रुकच्या महिला सरपंच पूजा प्रकाश सूर्यवंशी यांची महिला जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाधिकार्यांचे जिल्हास्तरातून अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्रातील सरपंचाचे प्रश्न सोडविण्यासाठी 22 मे पासून सरपंच परिषदेचे कराड ते मुंबई मंत्रालय धडक मोर्चा
महाराष्ट्रातील सरपंचाचे शासन स्तरावतील विविध प्रश्न सुटण्यासाठी 22 मे पासून कराड ते मुंबई मंत्रालय धडक मोर्चा काढण्याचा सरपंच परिषदेच्या राज्यस्तरीय मेळाव्यात निर्णय घेण्यात आला. पंचायत राज्य व्यवस्थेचे जनक स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या स्मृतिस्थळास अभिवादन करून कराड येथून हा मोर्चा निघणार आहे. यामध्ये राज्यातील सरपंच, उपसरपंच यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.