शहरात बकरी ईद उत्साहात साजरी
आषाढी एकादशीच्या हिंदू बांधवांना दिल्या शुभेच्छा
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अज्हा) गुरुवारी (दि.29 जून) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील ईदगाह मैदान येथे सकाळी 9:30 वाजता ईदची नमाज मौलाना नदिम अख्तर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी शहरातील मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.


नमाजच्या प्रारंभी धार्मिक व्याख्यान, नमाजनंतर खुदबा व त्यानंतर मुस्लिम बांधवांनी
देशात शांतता, समृध्दी व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना केली. मुस्लिम समाजाच्या वतीने आषाढी एकादशीच्या हिंदू बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. तर यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने समान नागरी कायद्याला विरोध दर्शवून केंद्र सरकारच्या निर्देशानूसार हरकती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले. मुस्लिम पर्सनल लॉ हा पवित्र कुरानच्या आधारावर आहे. मात्र समान नागरी कायद्यामुळे यावर गडांतर येणार असल्याने ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने जारी केलेल्या क्यूआर कोडच्या लिंकवर जाऊन आपल्या मेलद्वारे 14 जुलै पर्यंत समान नागरी कायद्याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात हरकती नोंदविण्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

मुस्लिम समाजाचा लोकशाही मार्गाने समान नागरी कायद्याला विरोध असणार असून, सोशल मीडियात देखील दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे युवकांना आवाहन करण्यात आले. युवकांकडून कोणत्याही प्रकारचे चूकीचे कृत्य घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाबरोबर मुस्लिम नागरिकांची देखील जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
सकाळी 7 वाजल्यापासून शहरातील विविध मशिदी मधून बकरी ईदची नमाज अदा करण्यात आली. ईदनिमित्त प्रमुख नमाज पठण कोठला येथील ईदगाह मैदानात झाली. मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या भेटी-गाठी घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.
या बकरी ईदनिमित्त कुर्बानीसाठी लागणारे बोकडं खरेदी-विक्रीत जिल्ह्यात कोट्यावधीची उलाढाल झाली. जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आठवडे बाजारात बोकडांची खरेदी विक्री सुरु होती. बकरी ईदला कुर्बानीसाठी लागणारे बोकडांच्या किंमती मध्ये या वर्षी मोठी वाढ दिसून आली.
बकरी ईद निमित्त तीन दिवस म्हणजे गुरुवार पासून शनिवार पर्यंत घरोघरी कुर्बानी केली जात आहे. ईद व आषाढी एकादशी एकाच दिवशी आल्याने हिंदू-मुस्लिम बांधव देखील एकमेकांना सणाच्या शुभेच्छा देताना दिसले. तर अनेकांनी सोशल मिडीयावर बकरी ईद व आषाढी एकादशीच्या शुभेच्छांची पोस्ट टाकून धार्मिक एकतेचे दर्शन घडविले. पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून ईदगाह मैदानसह शहरातील चौका-चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर ईदगाह मैदानात नमाजच्या दरम्यान बंदोबस्तासाठी शीघ्र कृती दलाचे पथक देखील तैनात होते. तसेच शीघ्र कृती दलाच्या पथकाने शहरातून संचलन देखील केले.